डब्लिन : लिओ वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला. आयर्लंडमधील तीन पक्षांच्या सत्ताधारी आघाडीतील दोन प्रमुख राजकीय पक्षांत ही सत्तासूत्रे हस्तांतरित झाली. वराडकर हे मिश्र वंशाचे आहेत. आयर्लंडमधील सर्वात तरुण नेत्यांपैकी एक असलेल्या वराडकर यांना पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. त्यांनी शनिवारी उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

४३ वर्षीय वराडकर यांचा पक्ष ‘फाइन गेल’ व मायकल मार्टिन यांच्या ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे होत असलेले आवर्तन आयर्लंडच्या इतिहासात अभूतपूर्व मानले जात आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आयरिश गृहयुद्धात हे दोन्ही पक्ष परस्परांचे विरोधक होते. २०२० च्या निवडणुकीनंतर आयर्लंडच्या ग्रीन्स पक्षासह या दोन्ही पक्षांनी आघाडी केली. त्यांच्यातील समझोत्यानुसार पंतप्रधानपदाची सूत्रे आलटून-पालटून येत असतात.

वराडकर यांनी २०१७ मध्ये फाइन गेल पक्षाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ‘एक नवीन चेहरा’ म्हणून पाहिले होते. पण ताओइसेच पदाच्या (पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द) अडीच वर्षांच्या काळानंतर २०२० च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यांची उपपंतप्रधानपदाची कारकीर्दही वादग्रस्त ठरली. त्यांनी नेतृत्व कौशल्यातील चमक गमावल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी केली.

गेल्या शतकातील उत्तरार्धात कठोर, पुराणमतवादी नैतिक विचारसरणीचे वर्चस्व असलेल्या आयर्लंडमध्ये वराडकरांचा आयरिश राजकारणातील उदय उल्लेखनीयच होता. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरले. भारतीय वंश लाभलेले ते पहिले पंतप्रधान ठरले. ‘समिलगी संबंधांचे उघड समर्थक’ अशीही त्यांची ओळख आहे. वराडकर यांचा जन्म डब्लिनमध्ये एका आयरिश आईच्या पोटी झाला. त्या परिचारिका होत्या. वराडकर यांचे पिता भारतातून आयर्लंडमध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक झाले होते. ते व्यवसायाने डॉक्टर होते.

कुशल नेतृत्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयर्लंडच्या ‘संडे इंडिपेंडंट’ वृत्तपत्राने डिसेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४३ टक्के नागरिकांनी मायकल मार्टिन यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली. तर ३४ टक्के मतदार वराडकरांच्या बाजूने होते. परंतु कंरोना महासाथीतून बाहेर पडण्यासाठी तसेच युरोपीयन महासंघातून २०१६ च्या सार्वमतानंतर बाहेर पडण्याचा ब्रिटनने निर्णय घेतल्यानंतर वराडकर यांनी आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. त्यांच्याकडे असलेल्या या अनुभवाचा आयर्लंडला फायदा होईल, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.