scorecardresearch

लेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख

निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

लेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख
निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान

पीटीआय, नवी दिल्ली : निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्ट. जन. चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस असतील. यासोबतच केंद्राच्या संरक्षणविषय विभागाचे ते सचिवही असतील. जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नऊ महिने सीडीएस हे पद रिक्त होते. बुधवारी केंद्र सरकारने लष्करात तब्बल ४० वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्ट. जन. चौहान यांची नियुक्ती जाहीर केली. काश्मीर खोरे आणि इशान्येकडील राज्यांमधील फुटिरतावाद्यांविरोधात अनेक मोहिमांचे चौहान यांनी नेतृत्व केले आहे. लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे २०२१मध्ये निवृत्त झाले. तत्पुर्वी मेजर जनरल असताना उत्तर आघाडीवर बारामुल्ला इथे लष्कराच्या पायदळाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. याखेरीज लष्करी मोहिमांचे महासंचालक म्हणून अनेक मोहिमांमध्ये चौहान यांचे मार्गदर्शन राहिले आहे. या प्रदीर्घ कारकीर्दीत चौहान यांना परमविशिष्ट सेवापदक, उत्तम युद्ध सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवापदकाने गौरवांकित करण्यात आले आहे. सीडीएस पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर चौहान यांना जनरलपदाचा दर्जा प्राप्त होईल, असे संरक्षणदलातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जबाबदारी काय?

लष्कर, नौदल आणि वायूदलामध्ये समन्वय करून देशाच्या एकूण सैन्यदलास बळ देण्याची मुख्य जबाबदारी संरक्षण दलप्रमुखावर असते. याखेरीज उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी आघाडय़ांची फेररचना, मोहिमांवेळी आघाडय़ा आणि सैन्यदलांमध्ये समन्वय ठेवणे हेदेखील सीडीएसने करायचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या