चेन्नई : घरोघरी अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कर्मचाऱ्याने ग्राहकास हिंदी भाषेतून संभाषणाचा आग्रह धरला, तसेच प्रत्येकाला हिंदी भाषा आली पाहिजे कारण ती राष्ट्रभाषा आहे अशी पुस्तीही जोडली. या प्रकाराला ट्विटरवर वाचा फुटल्यानंतर झोमॅटो कंपनीने तमिळ आणि इंग्रजीतून दिलगिरी व्यक्त केली.
विविध संस्कृतीने नटलेल्या देशात विशिष्ट भाषेचा आग्रह धरणे गैर आहे असे सांगून, आम्ही त्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले आहे असे कंपनीने म्हटले आहे. काही तासांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी र्दींपदर गोयल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये मात्र या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतल्याची माहिती दिली. कॉल सेंटर एजंट हे भाषेतील वा प्रादेशिक भावभावनांचे तज्ज्ञ नसतात. चूक झाल्यास समजून घेतले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
झोमॅटोचे ग्राहक विकास यांनी म्हटले आहे की, संभाषणाचे स्क्रीन शॉट आपण टाकले आहेत. त्यात विकास यांनी भाषेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. झोमॅटो कर्मचाऱ्याने विकास यांना असे स्पष्टीकरण दिले की, भाषेच्या अडथळ्यामुळे पाच वेळा फोन करुनही संभाषण योग्य होऊ शकले नाही.
तमिळनाडूत काम करायचे असेल तर तमिळ येत असलेली माणसे ठेवावीत, असे विकास म्हणाले. विकास यांच्या ट्वीटला ४५०० लाइक मिळाले. तर २५०० रिट्वीट झाले. ‘रिजेक्ट झोमॅटो’ हा ट्र्रेंडगचा विषय ठरला.
कपड्यांच्या जाहिरातीवर आक्षेप
नवी दिल्ली : फॅब इंडिया ही कपड्यांच्या उत्पादनाची कंपनी वादात सापडली आहे. त्यांच्या ‘जश्न ए रिवाझ’ या कपड्यांच्या उत्पादनाच्या मालिकेवर समाजमाध्यमांतून टीका करण्यात आली आहे.
फॅब इंडियाने ९ ऑक्टोबरच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, जश्न ए रिवाझ ही उत्पादनांची नवी मालिका सणासुदीसाठी सादर करण्यात येत आहे. ट्विटरवरील पोस्टमध्ये यातील महिला व पुरूष तांबड्या रंगछटेत दाखवले होते. त्यानंतर कंपनीने सदर ट्वीट व जाहिरात सोमवारी मागे घेतली. समाज माध्यमावर या प्रकाराबाबत चर्चा झाली होती, त्यात दिवाळी या हिंदू सणास हे शोभणारे नाही असे म्हटले होते. ‘बायकॉट फॅब इंडिया’ हा ट्रेंड त्यामुळे सुरू झाला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी समाजमाध्यमातून यावर आवाज उठवला.
कंपनीचे स्पष्टीकरण
फॅब इंडिया जोडफॅब इंडियाने म्हटले आहे की, कंपनीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रत्यक्षात फॅब इंडिया -सेलेब्रेट इंडिया अशी आमची टॅगलाइन होती.आमची जश्न ए रिवाझ ही मालिका भारतीय परंपरेचे उत्सवीकरण असून या वाक्याचा अर्थ वेगळा आहे. ती मालिका दिवाळी पेहरावासाठी नव्हती. आमच्या आगामी दिवाळी पोशाखाची टॅगलाइन ‘झिलमिल सी दिवाली’ अशी आहे.