Pahalgal Terror Attack Investigation : पहलगाम येथे १५ दिवसांपूर्वीच नव्याने दुकान उघडलेल्या दुकानदाराने दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी मात्र दुकान बंद ठेवलं होतं. त्याची ही कृती संशयास्पद आढळल्याने सर्व तपास यंत्रणांनी आता त्याची चौकशी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनही त्याची चौकशी होणार आहे, इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड तपासणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीला सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून आतापर्यंत १०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून एका दुकानदाराने घटनेच्या दिवशी दुकान उघडलं नसल्याचं समोर आलंय. इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याची चौकशी सुरू केली असून धागेदोरे सापडण्याकरता इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड तपासला जाणार आहे.

केंद्रीय एजन्सींच्या सूत्रांनी सांगितले की, एनआयएच्या पथकाने त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व स्थानिकांची यादी तयार केली आहे आणि आता त्यांची चौकशी सुरू आहे. “हे प्रकरण एनआयएकडे असल्याने, आम्ही त्यांना मदत करत आहोत आणि सर्व स्थानिकांना त्यांच्याकडे पाठवत आहोत”, असे सूत्रांनी सांगितले. “त्यांनी आतापर्यंत १०० स्थानिकांची चौकशी केली आहे, ज्यात पोनी ऑपरेटर, दुकानदार, छायाचित्रकार आणि साहसी क्रीडा उपक्रमांमध्ये काम करणारे लोक यांचा समावेश आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला, एनआयएने एका पर्यटकाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंपैकी एकामध्ये “अल्लाहू अकबर” म्हणत असलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी केली होती आणि त्याला क्लीन चिट दिली होती. “चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की तो “अल्लाहू अकबर” म्हणत असताना घाबरला आणि लगेचच घटनास्थळावरून निघून गेला. घरी पोहोचल्यानंतरही त्याने पोलिसांनाही माहिती दिली नाही. संध्याकाळी उशिरा त्याने त्याच्या मित्राला फोन केला,” असे दुसऱ्या एका सूत्राने सांगितले.

“केंद्रीय संस्था आणि एनआयए मागील सर्व प्रकरणांचा आढावा घेत आहेत आणि सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून या हल्लेखोरांविरुद्ध एक मजबूत खटला उभारता येईल”, असे सूत्रांनी सांगितले.

भारत-पाकिस्तान संबंध ताणले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने सिंधू जल करार “स्थगित” ठेवला आहे, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत, अटारी येथील एकात्मिक तपासणी नाके बंद केले आहेत, राजदूतांना हद्दपार केले आहे. या आठवड्यात, भारताने पाकिस्तानमध्ये येणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी घातली आहे.