कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आपल्या राजीनामापत्रात स्वत:चा बचाव करताना देशावरील आर्थिक संकटासाठी करोना महासाथ आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या टाळेबंदीला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार मी माझ्या मातृभूमीची सेवा केली. भविष्यातही मी ही सेवा करत राहणार आहे.’’ संसदेच्या सभापतींना उद्देशून लिहिलेले हे राजीनामपत्र शनिवारी  विशेष अधिवेशनात वाचून दाखवण्यात आले.

राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्राध्यक्षपद रिक्त झाल्याचे औपचारिकरित्या जाहीर करण्यासाठी श्रीलंकेच्या संसदेचे १३ मिनिटांचे संक्षिप्त विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. आधी मालदीव व त्यानंतर सिंगापूरला गेलेल्या राजपक्षे यांनी तेथून संसद सभापती महिंदूा यापा अभयवर्धने यांना पाठवलेल्या राजीनामापत्राचे वाचन संसद सचिव धम्मिका दस्सनायके यांनी केले.

राजीनामापत्रात गोताबया यांनी नमूद केले, की आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वपक्षीय सरकारच्या स्थापनेसह उत्तम उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले. आपल्या तीन महिन्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कालावधीतच अवघ्या जगाला करोना महासाथीचा फटका बसला. या महासाथीत मी देशवासीयांच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. देशात आधीच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था त्यानंतर अधिकच खराब झाल्याने विवशता आली. २०२० ते २०२१ दरम्यान देशात मला टाळेबंदीचे आदेश द्यावे लागले. त्याचवेळी परकीय चलन गंगाजळीची अवस्था बिकट झाली. त्यावेळी सर्वपक्षीय राष्ट्रीय सरकारची स्थापना करण्याची माझी पावले सुयोग्य होती.

अध्यक्षपदाच्या स्पर्धेत चार नेते 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळजीवाहू राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांच्यासह एकूण चार नेते श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहेत. २२५ सदस्य असलेल्या श्रीलंकेच्या संसदेवर राजपक्षे यांच्या सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना (एसएलपीपी) पक्षाचे वर्चस्व आहे. हंगामी अध्यक्ष विक्रमसिंघे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केल्यानंतर या पक्षात विरोधी आवाज उठू लागला आहे. पक्षाध्यक्ष जी. एल. पेरिस म्हणाले की ‘एसएलपीपी’ने स्वपक्ष सदस्याशिवाय इतर कोणालाही मत देऊ नये. पक्षाचे नेते व अध्यक्षपदासाठी इच्छुक अल्हप्परुमा यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे.