करोनाचा विळखा मोडून काढण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. त्यामुळेच भारतातील ५४८ जिल्हे लॉकडाउन करण्यात आले आहेत. देशातील ३० राज्ये सध्या लॉकडाउन आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा संख्या ९७ वर पोहचला आहे. तर देशातील करोनाग्रस्तांची संख्या ४९९ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार काळजी घेण्याचं आणि घरातच थांबण्याचं आवाहन केलं जातं आहे. तसेच घाबरुन जाऊ नका, स्वयंशिस्त पाळा हेदेखील सांगितलं जातं आहे. आजतक ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच महाराष्ट्रातील संचारबंदीचा निर्णय जाहीर केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन गांभीर्याने घ्या असं आवाहन केलं आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. मात्र नागरिकांनी या सगळ्या काळात घरी राहून, स्वयंशिस्त पाळून आम्हाला सहकार्य करा असंही आवाहन करण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, गुजरात, हरयाणा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओदिशा, पुद्दुचेरी, तेलंगण, तामिळनाडू, राजस्थान, चंदीगढ, जम्मू काश्मीर, लडाख या राज्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आहेत. कालपर्यंत ४१८ असलेला ही संख्या आता ४९९ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात ही संख्या ८९ होती जी आता ९७ वर पोहचली आहे.