संसदेत राहुल गांधींच्या माफीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी या मागणीसाठी लोकसभेत सत्ताधारी चांगलेच आक्रमक झालेले दिसले. तर त्यांना काँग्रेससह इतर विरोधकांनीही उत्तर दिलं. या दोहोंमधला गदारोळ इतका वाढला की शेवटी लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. काही वेळापूर्वीच ही घटना घडली. भाजपाकडून सातत्याने राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी होते आहे. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्ष हे विविध मागण्यांसाठी गदारोळ करत आहेत. याच गदारोळात दुपारी दोन वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभेत हेच पाहण्यास मिळतं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ आणि हंगामा हेच चित्र दिसून येतं आहे.

लोकसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी काय घडलं?

लोकसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या संसदीय कार्यकारणिची बैठक पार पडली. त्यामध्ये पुढे काय रणनीती ठरवायची यावर चर्चा झाली. ब्रिटनमध्ये राहुल गांधी यांनी देशाबाबत जे भाषण केलं त्यावर भाजपाकडून सातत्याने माफी मागण्याची मागणी केली जाते आहे. मात्र काँग्रेसने हे देखील म्हटलं होतं की लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं ही आमची इच्छा आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोहोंची ही जबाबदारी आहे असंही काँग्रेसने म्हटलं होतं.

आज नेमकं काय घडलं?

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे अदाणींच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. मोदी आणि भाजपा अदाणींना पाठिशी का घालत आहेत? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जातो आहे. तसंच यासाठी रस्त्यावरही आंदोलनं होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये केलेली वक्तव्यं ही कशी देशविरोधी आहेत आणि त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही मागणी होते आहे. या दोन मुद्द्यांवरून आज पुन्हा एकदा लोकसभेत हंगामा आणि गदारोळ झाला आणि लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. ६ एप्रिलला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. केंद्र सरकारला केंद्रीय अर्थसंकल्प ३१ मार्च २०२३ च्या आधी दोन्ही सभागृहात मंजूर करून घ्यायचा आहे. त्यामुळे किमान या आठवड्यात कामकाज सुरू व्हावं अशी अपेक्षा केंद्रालाही आहे.