अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय भवितव्य ठरणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ३८२ संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २१०० मतदान केंद्रांवरील थेट प्रक्षेपणाद्वारे तेथील मतदान प्रक्रियेवर करडी नजर असेल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

राज्यात या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदारसंघात असून सर्वात कमी १० उमेदवार लातूर मतदारसंघात आहेत. १५ पेक्षा जास्त उमेदवार असलेले चार मतदारसंघ असून यापैकी बीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे ३ बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट, तर अन्य सहा मतदारसंघात प्रत्येकी एक बॅलेट युनिट लागणार आहेत.

राज्यात दुसऱ्या टप्यातील ३८२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ७१ मतदान केंद्रे सोलापूर मतदारसंघातील असून त्याखालोखाल ६४ संवेदनशील मतदान केंद्रे परभणीतील आहेत. लातूर ४८, नांदेड ४७, अमरावती ३७, तर बीडमध्ये ३७ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम, तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

देशात आज इथे मतदान..

तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होणार आहे. ओदिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 poll for 10 lok sabha seats in maharashtra held today
First published on: 18-04-2019 at 04:13 IST