‘माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधानपदी राहिले आहेत. पण जो सन्मान मोदींनी देशाला मिळवून दिला आहे. तो दीर्घ काळापासून कोणीही देशाला देऊ शकला नव्हता. हा माणूस केवळ देशासाठी जगत असून देशासाठीच ते आपले प्राण देतील. त्यांना केवळ देशाची चिंता आहे,’ असे वक्तव्य गांधी कुटुंबीयांमधीलच एक सदस्य आणि भाजपा नेते वरुण गांधी यांनी केले आहे. ते ‘एबीपी’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ‘जर मी भाजपा सोडली तर राजकारणालाही रामराम करेन. पंतप्रधान मोदी हे मला पित्यासमान आहेत,’ असेही त्यांनी म्हटले. मुलाखतीदरम्यान वरुण गांधी यांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावरही चर्चा केली.

सुलतानपूर ऐवजी पिलिभीत मतदारसंघातून निवडणूक लढवण्याविषयी गांधी म्हणाले की, ‘जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात असता तेव्हा निर्णय तुमच्या नेतृत्वावर सोडावे लागतात. मला सुलतानपूर ऐवजी पिलिभीतमधून लढण्यास सांगण्यात आले. माझ्यासाठी सुलतानपूरही घर आहे आणि पिलिभीतही.’

ते म्हणाले, ‘माझ्यावर हेट स्पीचचे (भावना भडकवणारे भाषण) अनेक आरोप आहेत. मात्र, सर्व प्रकरणांमध्ये मी विजय मिळवला. तर तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने औपचारिकरित्या माझी माफीही मागितली. मी हिंदू आहे आणि माझ्या दिवसाची सुरूवात हनुमान चालिसाने होते. पण माझ्या धर्माचे माझ्या राजकारणाशी काही देणे-घेणे नाही.’

‘पंतप्रधान मोदी यांच्याशी आतापर्यंत जितक्यावेळा भेटलो. तेव्हा-तेव्हा मी त्यांच्यात एका चांगल्या नेत्याबरोबरच एक चांगला माणूस त्यांच्यात पाहिला आहे. जेव्हा केव्हा माझ्या जीवनात संकट आले. ते माझ्याबरोबर वडिलांप्रमाणे उभे राहिले. जेव्हा माझ्या पहिल्या मुलीचा मृत्यू झाला, त्यावेळी मी खचलो होतो. सर्वांत आधी मला पंतप्रधान मोदींचा फोन आला होता. देव परीक्षा घेतो, असे त्यांनी म्हटले होते. देवाने एक देवी घेतली आहे. तो दुसरी देवी देईन,’ असे ते म्हणाले होते.

सुलतानपूर मतदारसंघाचे खासदार असलेले वरुण गांधी म्हणाले, ‘आतापर्यंत सुमारे १० लाख लोकांनी मी काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. पण असे काही नाही. मी एकाच नावेत स्वार होणारा व्यक्ती आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी मी भाजपात आलो होतो. जेव्हा मी पक्ष सोडेन तेव्हा मी राजकीय संन्यास घेईन.’

काँग्रेस अध्यक्षांकडून ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या जातात. त्यावर वरुण गांधी म्हणाले की, हे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी सध्या लोकप्रियतेत देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. एखाद्या पंतप्रधानाला चोर म्हणणे चुकीचे आहे. आज मोदी पंतप्रधान आहेत. २० वर्षांनंतर आणखी कोणी असेल.’