भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारसभेदरम्यान एक विचित्र प्रकार शनिवारी अमरावती येथील जरुडमधील प्रचारसभेत घडला. वर्धा लोकसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या तडस यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपा आमदार अनिल बोंडे सभेत भाषण देत होते. त्याचवेळी एका तरुणाने मध्येच उभं राहून बोंडे यांना विकासकामांसंदर्भात प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. पण बोंडेंसहीत इतर नेत्यांनी आपली भाषण सुरु ठेवत वेळ मारुन नेली. मात्र नंतर या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त ‘आयबीएन लोकमत’ने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंचावरुन भाजपा नेते उपस्थितांना संबोधित करत असताना अचानक एक तरुण उभा राहिला. ‘तुम्ही मतदारसंघाचा कोणता विकास केला ते सांगा?’, असा प्रश्न या तरुणाने सध्याचे भाजपा खासदार रामदास तडस आणि भाजपा अमदार अनिल बोंडे यांना विचारला. उत्तराच्या अपेक्षेने तरुणाने प्रश्न विचारला असता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रश्न विचारल्याबद्दल तरुणाला अटक केल्याने प्रशासनावर दडपशाहीचा आरोपही केला जात आहे.

अशाप्रकारे भाजपा नेत्यांना विकासकामांबद्दल प्रश्न विचारण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या उमेदवार आणि गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी गावांना भेटी देण्याऱ्या आमदार संगीता ठोंबरेंनाही जनतेच्या रोषाला समोरे जावे लागले. केज तालुक्यातील माळेगाव येथे ठोंबरे प्रचारासाठी गेल्या असता काही गावकऱ्यांना त्यांनी पाच वर्षात तुम्ही गावासाठी काय केलं अशा स्वरुपाचे प्रश्न विचारले. ठोंबरेंचा सत्कारवगैरे झाल्यानंतर त्या भाषणासाठी उभ्या राहिल्या असता त्यांच्यावर गावकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. रस्ते, विकास कामे, पीक विमा, मदतनिधी यासंदर्भात अनेक प्रश्न ठोंबरे यांना विचारण्यात आल्या. या अनपेक्षित प्रश्नांमुळे आयोजकही गोंधळले. काही काळ आयोजक आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाल्याने तणावाचे वातावरण होते. आमदार ठोंबरे या प्रकारामुळे चांगल्याच संतापल्या. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ स्थानिक परिसरामध्ये व्हायरल झाला. विरोधकांनाही या प्रकारावरुन ठोंबरे यांना चांगलेच ट्रोल केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 young boy arrested in wardha for asking questions to bjp mp in rally
First published on: 08-04-2019 at 08:48 IST