महेश सरलष्कर

दुसऱ्या कार्यकाळात नवे शैक्षणिक धोरण राबवण्यावर अधिक भर दिला गेला, त्याची जबाबदारी प्रधान यांच्याकडे दिली गेली.  ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रमही त्यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे पार पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ नंतर मंत्र्यांची नवी फळी तयार केली त्यातील एक आहेत धर्मेद्र प्रधान. बारा वर्षे राज्यसभेत राहिल्यानंतर प्रधान पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ओडिशातील संबलपूर मतदारसंघातून २००४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये त्याच मतदारसंघात प्रधानांचा पराभव झाला होता. पण, भाजपने त्यांना २०१२ मध्ये राज्यसभेवर पाठवले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आल्यावर मात्र प्रधानांना राजकीय प्राधान्य मिळाले, त्यांची वेगाने प्रगती झाली.

हेही वाचा >>> जम्मू-काश्मीरमधून लष्कर, अफ्स्पा मागे घेण्याचा विचार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सूतोवाच  

धर्मेद्र प्रधानांना वडील देबेंद्र प्रधान यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेले आहे. देबेंद्र हे वाजपेयींच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. महाविद्यालयीन काळापासून धर्मेद्र प्रधान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय झाले. या विद्यार्थी संघटनेतून भाजप नेते आयात करतो, अरुण जेटलींपासून अनेक नेते ‘अभाविप’मधून आलेले आहेत. तसे धर्मेद्र प्रधानही ‘अभाविप’तून भाजपमध्ये आले. वाजपेयींच्या काळात सक्रिय राहिलेल्या नेत्यांना मोदींनी बाजूला केले तरी या नेत्यांच्या वारसांना त्यांनी केंद्रात संधी दिली. अनुराग ठाकूर, आता बासुरी स्वराज, त्याप्रमाणे धर्मेद्र प्रधान यांच्यावरही मोदींनी विश्वास दाखवला. मोदींच्या भाजपमध्ये संघटना आणि सरकार या दोन्हींमध्ये महत्त्व असलेल्या नेत्यांमध्ये धर्मेद्र प्रधानांचे नाव घेतले जाते.

२०१४ मध्ये मोदींनी प्रधानांनी पेट्रोलियम मंत्रालयाचे राज्यमंत्री केले. तीन वर्षांनी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रधानांना त्याच मंत्रालयात बढती मिळाली आणि ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री झाले. कोणत्याही सरकारमध्ये हे मंत्रालय अत्यंत महत्त्वाचे ठरते. काँग्रेसच्या काळात एका उद्योजकाला त्रासदायक ठरणाऱ्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची तडकाफडकी उचलबांगडी झाली होती. हे उदाहरण पाहिले तर या मंत्रालयात काम करणे ही तारेवरील कसरत असते. पण, धर्मेद्र प्रधान सर्वाधिक काळ पेट्रोलियम मंत्री राहिले. त्यांच्या कार्यकाळात मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी उज्ज्वला गॅस योजना देशभर लागू केली गेली. सवलतीच्या दरात महिलांना गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या या योजनेचा मोदी सरकारने विस्तार केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील भाजपचा हा प्रमुख मुद्दा ठरला होता. म्हणूनच धर्मेद्र प्रधान यांना ‘उज्ज्वला मॅन’ म्हणतात. प्रधान पंधरा वर्षांनंतर ओदिशातील लोकांमध्ये जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत.