राज्यसभेने सुचविलेल्या सुधारणांना मान्यता देत लोकसभेत बुधवारी लोकपाल विधेयक संमत होताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या विधेयकाची यथायोग्य अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवर देखरेख समित्या स्थापण्याची नवी योजना बुधवारी जाहीर केली. लोकपाल विधेयक मंजूर झाल्याचे स्वागत करीत अण्णांनी गेले नऊ दिवस सुरू असलेल्या उपोषणाची सांगता केली. सार्वत्रिक निवडणुकीचा आचारसंहिता लागू होण्याआधीच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करा, अशी मागणीही त्यांनी केली.
लोकसभेत एकीकडे काँगेस व भाजपची एकजूट तर दुसरीकडे तेलंगणा समर्थक-विरोधकांच्या  गोंधळात हे विधेयक मंजूर झाले. दुपारी सव्वाबारा वाजता विधेयकावर चर्चेला सुरुवात करण्यात आली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची ही केवळ सुरुवात आहे. अद्याप आठ नवीन कायदे प्रलंबित आहेत. सहा विधेयकांवर चर्चेलाही सुरुवात झालेली नाही. त्यासाठी चालू अधिवेशनाचा कालवधी वाढविण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली.  पंतप्रधानांचा लोकपालच्या कक्षेत समावेश केल्याबद्दल जदयू नेते शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आपण या विधेयकाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले. समाजवादी पक्ष व शिवसेना सदस्यांनी विरोध नोंदवित सभात्याग केला. त्यानंतर संमत झालेले हे विधेयक दोन दिवसांत राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
या लोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमल्या जाणाऱ्या पथकासाठी स्वच्छ चारित्र्याचे निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस महासंचालक यांचा शोध घेतला जाणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.  आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना बरोबर घेऊन राष्ट्रीय पातळीवर संघटन उभे केले जाणार आहे. या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वच्छ चारित्र्याच्या नागरिकांनी राळेगणसिद्घीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही अण्णांनी केले.
‘श्रेय काँग्रेसचे नव्हेच’
विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी लोकसभेत विधेयकावर बोलताना काँग्रेसला चिमटा काढला. लोकपाल विधेयक मंजूर केल्याचे श्रेय काँग्रेसने घेऊ नये. लोकपालसाठी उपोषणाला बसणारे अण्णा हजारे व देशाच्या जनतेला याचे श्रेय द्यावे, असे त्या म्हणाल्या.
पैशाची गरज!
लोकपालवर देखरेख ठेवण्याच्या कामासाठी आता मोठया प्रमाणावर पैसा लागणार असून देशातील १२० कोटी जनतेने प्रत्येकी पाच रूपये दिले तरी देशासाठी मोठे काम होईल. आतापर्यंत आम्ही कोणाकडे पैसे मागितले नाहीत, परंतु पुढील जबाबदारी मोठी असल्याने आंदोलनासाठी निधीची गरज भासणार आहे, असे ते म्हणाले.
श्रेय जनतेचे व अण्णांचे
विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी लोकसभेत विधेयकावर बोलताना काँग्रेसला चिमटा काढला. लोकपाल विधेयक मंजूर केल्याचे श्रेय काँग्रेसने घेऊ नये. लोकपालसाठी उपोषणाला बसणारे अण्णा हजारे व देशाच्या जनतेला याचे श्रेय द्यावे, असे त्या म्हणाल्या.
लोकपाल विधेयक..एक खडतर प्रवास
राज्यसभेत ‘लोकपाल’ संमत
अण्णा आणि अरविंद