दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे मागणारे विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी केला होता. बिहारच्या पाटणा येथे ३ मार्च रोजी पार पडलेल्या एनडीएच्या ‘संकल्प रॅली’मधील भाषणादरम्यान मोदींनी एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांवर जोरदार टीका केली. मात्र मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर केलेला हा आरोप ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या वाचकांना पटलेला नाही. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने घेतलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये ६१ टक्के वाचकांनी मोदींने काँग्रेसवर केलेला हा आरोप पटला नसल्याचे म्हटले आहे. फेसबुक आणि ट्विटवर घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये एकूण १३ हजार ७०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘संकल्प रॅली’मधील भाषणादरम्यान मोदींनी हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांवर टीका करताना काँग्रेसला लक्ष्य केले. ‘भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे आता विरोधकांकडून मागितले जात आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत? ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधानं त्यांच्याकडून का केली जात आहेत? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.

‘लोकसत्ता डॉट कॉम’ने मोदींच्या याच वक्तव्यावरुन एक जनमत चाचणी घेतली. यामध्ये वाचकांना, ‘विरोधकांकडून सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप पटतो का?’ हा प्रश्न विचारण्यात आला. फेसबुकवर या सर्वेक्षणामध्ये ११ हजार २०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. फेसबुकवर मत नोंदवणाऱ्या एकूण वाचकांपैकी ६१ टक्के वाचकांनी आपल्याला मोदींचे हे मत पटत नसल्याचे सांगितले. पुरावे मागून काँग्रेस सैन्याचे खच्चीकरण करत असल्याचा मोदींचा आरोप योग्य असल्याचे मत उर्वरीत ३९ टक्के वाचकांनी व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणात मोदींविरोधी मत देणाऱ्या वाचकांची संख्या ६ हजार ७०० हून अधिक आहे तर मोदींच्या बाजूने मत देणाऱ्या वाचकांची संख्या ४ हजार ४०० इतकी आहे.

या सर्वेक्षणाच्या पोस्टवर अनेक वाचकांनी आपली मतेही नोंदवली आहेत. यामध्ये सैनिकांच्या नावाखाली सरकारच राजकारण करत असल्याचे मत काही वाचकांनी मांडले आहे. तर काही वाचकांनी मोदींची बाजू योग्य असल्याचे मत नोंदवले आहे. पाहुयात याच पोस्टवरील काही कमेन्टस

याच प्रश्नावर ट्विटवरही अडीच हजारहून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ८६ टक्के वाचकांनी मोदींनी केलेला आरोप पटला नसल्याचे मत नोंदवले आहे. तर केवळ १४ टक्के वाचकांनी मोदींचे मत योग्य असल्याचे म्हटले आहे. मोदींचे मत पटले नाही असं म्हणणाऱ्या ट्विटवरील वाचकांची संख्या एक हजार ७६३ इतकी आहे तर मोदींच्या बाजूने मत नोंदवणाऱ्यांची संख्या ७३८ इतकी आहे.

ट्विटवरही अनेकांनी मोदींच्या या वक्तव्याबद्दल आपले मत रिप्लाय करुन व्यक्त केले आहे. पाहुयात याच ट्विटवर आलेल्या काही वाचकांच्या कमेन्ट्स

काँग्रेसने एअर स्ट्राइकचे पुरावे मागीतल्यानंतर विरोधी पक्षांवर टिका करताना मोदींने सैनिकांच्या खच्चीकरणासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी, ‘हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकबाबत शंका नाहीयेत पण अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याचे पुरावे जगासमोर सादर केले होते. त्याचप्रमाणे भारतानेही एअर स्ट्राइकचे भक्कम पुरावे सादर करावेत, कारण हे तंत्रज्ञानाचं युग आहे, उपग्रहाद्वारे छायाचित्र घेता येऊ शकतात’ असं म्हटलं होतं. त्यावरुनच पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेसकडून सैनिकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta poll readers disagree with pm modis comment saying congress and allies demoralizing our forces
First published on: 06-03-2019 at 13:46 IST