ब्रिटिश एअरवेजच्या विमानाच्या एका इंजिनाला आग लागल्याने हे विमान तातडीने हिथ्रो विमानतळावर उतरवावे लागले. या घटनेमुळे अधिकाऱ्यांना काही कालावधीसाठी विमानतळ बंद करणे भाग पडले.
विमानाच्या इंजिनाला आग लागणे, हे दहशतवादी कृत्य नसल्याचे सांगण्यात येत असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यापूर्वी विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याच्या टोकाच्या भागातून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे दिसत होते.
बीए-७६२ हे विमान हिथ्रो येथून ओस्लो येथे जात होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते हिथ्रो विमानतळावर तातडीने उतरवावे लागले, असे ब्रिटिश एअरवेजने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
ए३१९ एअरबसमध्ये एकूण ७५ प्रवासी होते, तांत्रिक बिघाड आढळताच विमान विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले. सध्या आम्ही प्रवाशांची काळजी घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विमानाची तपासणी करण्यासाठी आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जात असल्याचेही एअरवेजने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे दक्षिण आणि उत्तरेकडील धावपट्टय़ा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने दक्षिणेकडील धावपट्टी सुरू करण्यात आली. उत्तरेकडील धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आल्याने अद्याप ती बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि बाहेर जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रक कोलमडले.
लंडन-मुंबई या जेट एअरवेजच्या विमानाचे सकाळी होणारे उड्डाणही लांबणीवर पडले. हिथ्रो हे जगातील अत्यंत गजबजलेले विमानतळ असून तेथील दोन धावपट्टय़ांवर प्रत्येक ४५ सेकंदाला विमानाचे उड्डाण आणि आगमन होत असते. या घटनेमुळे अनेक विमानांची उड्डाणे ब्रिटनमधील अन्य विमानतळांकडे वळविण्यात आली.
सदर विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे दिसत होते, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याने स्काय न्यूजला सांगितले. मात्र आता आग आटोक्यात आली असल्याचे लंडनच्या अग्निशमन दलाने सांगितले. डेव्हिड गॅलघेर या प्रवाशाचे ट्विटरवर या प्रसंगाचे वर्णन केले आहे. विमानावर पक्षी आदळल्यामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Londons heathrow airport reopens after emergency landing by plane
First published on: 24-05-2013 at 06:10 IST