जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. मागील सलग २७ दिवसांपासून पुंछ जिल्ह्यातील सुरणकोट-मेंधर भागातील जंगलात ही कारवाई सुरू आहे. शनिवारी (६ नोव्हेंबर) सैन्यानं आपलं लक्ष पुंझ जिल्ह्याचा शेजारी जिल्हा राजौरीवर केंद्रीत केलंय. या ठिकाणी दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुघल रोडच्या राजौरी-ठाणमंडी भागातील वाहतूक बंद करण्यात आलीय. सैन्याने दहशतवाद्यांची घेराबंदी करत आपली शोध मोहीम राजौरीच्या थानामंडी भागातील खबलान जंगलाकडे नेलीय. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबरपासून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात दहशतवादी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर १० ऑक्टोबरपासून या भागात सैन्य मोहीम सुरू झालीय.

सर्वाधिक काळ चाललेली सैन्य मोहीम

सैन्याची ही मोहीम आजपर्यंतची सर्वाधिक काळ चाललेली अशाप्रकारची शोध मोहीम मानली जात आहे. सुरुवातीला ११ ऑक्टोबरला ५ जवान शहीद झाल्यानंतर देशाचं लक्ष या कारवाईकडे गेलं. यानंतर याच भागात १४ ऑक्टोबरला आणखी ४ जवान शहीद झाले. यानंतर भारतीय सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय.

नेमकं काय घडलं?

भारतीय सुरक्षा दलाला पुंछमधील सुरनकोटच्या डेरा की गली गावात काही दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालत शोध मोहीम सुरू केली. याच दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. यात ४ जवानांसह एक कनिष्ठ अधिकारी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला.

चरमेरमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चरमेरच्या जंगलात लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर आता या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आलंय. दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून पूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आलीय. जंगलात ४-५ दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह असल्याचा अंदाज आहे.

लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यात प्रतिकार दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे किमान तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळत आहे. काश्मीर भागातल्या पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

आपल्या ट्विटमध्ये काश्मीर पोलीस म्हणतात, शोपिअन इथल्या चकमकीत मारले गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव मुख्तार शाह असल्याचं समोर आलं आहे. तो गंदेरबालचा आहे. बिहारमध्ये विरेंद्र पासवान नावाच्या एका फेरीवाल्याला मारल्यानंतर तो शोपियानमध्ये राहायला आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Longest search operation by indian army in jk 9 soldiers killed so far pbs
First published on: 07-11-2021 at 11:03 IST