एपी, देर अल-बला

इस्रायल आणि गाझातील अतिरेकी हमास सत्ताधारी यांच्यात गेले तीन आठवडे सुरू असलेल्या युद्धामुळे कोलमडलेली सार्वजनिक सुव्यवस्था आणि वाढती निराशा यांची चिन्हे दिसू लागली आहेत. गव्हाचे पीठ आणि प्राथमिक गरजेच्या इतर वस्तू हस्तगत करण्यासाठी हजारो लोक गाझामधील गोदामांमध्ये घुसले, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेने रविवारी सांगितले.

  ‘तीन आठवडे चाललेले युद्ध आणि गाझाला असलेला कडेकोट वेढा यामुळे गाझातील नागरी सुव्यवस्था कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. लोक घाबरलेले व निराश झाले आहेत,’ असे ‘यूएनआरडब्ल्यूए’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनी निर्वासितांसाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेचे गाझातील संचालक थॉमस व्हाइट म्हणाले.

  यूएनआरडब्ल्यूए गाझातील हजारो लोकांना मूलभूत सेवा पुरवते. या भागात असलेल्या त्यांच्या शाळांचे रूपांतर या संघर्षांमुळे विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी लोकांसाठीच्या आश्रय स्थळांमध्ये झाले आहे. इस्रायलने इजिप्तमधून अगदी थोडय़ा प्रमाणात मदत गाझामध्ये नेण्याची परवानगी दिली असून, ही मदत लोक ज्या गोदामांमध्ये शिरले त्यापैकी एका गोदामात साठवण्यात आली होती, असे या यंत्रणेने सांगितले.