अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात आज सकाळी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. हे विमान निवासी परिसरात कोसळल्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता विमान अपघातामागचं नेमकं कारण काय होतं? याविषयी माहिती घेतली जात आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही बसले होते अशीही माहिती समोर आली आहे.
विमानात नेमके किती प्रवासी, क्रू मेंबर्स होते?
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विमानात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान अपघातानंतर काय झालं ते प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
“अगदी भूकंप झाल्यासारखा आवाज आला, एक धडाम असा आवाज आला. आम्ही धावत आलो बाहेर धुराचे लोट होते आणि मृतदेहांचा खच पडला होता. काय करावं काहीही सुचत नव्हतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.” पीटीआयला ही माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
विमानात १६९ भारतीय प्रवासी होते. त्याशिवाय, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक तर १ कॅनडाचा नागरिक प्रवास करत होते. जखमींना रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल केलं जात असून घटनास्थळी बचावकार्य चालू आहे.
एअर इंडियाचं निवेदन काय?
अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या या बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आम्ही 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करेल.