उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये तरुणाने एका पोलीस अधिकाऱ्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. पीलीभीतहून सरकारी कामासाठी आलेले पोलीस अधिकारी गणवेशात होते. निरालानगरमध्ये त्यांची कार एका कारला धडकली. यावर तरुणांनी त्यांना घेरले आणि कॉलर धरून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

हसनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निरालानगर येथील एका हॉटेलमध्ये लग्नसमारंभ होता. पिलीभीतहून लखनऊला बदली झालेले पोलीस निरीक्षक विनोद कुमार काही कामानिमित्त अलीगंजहून निराला नगरला जात होते. यादरम्यान त्यांची कार एका कारला धडकली. गाडी थांबवून ते बाहेर येताच समारंभात सहभागी असलेल्या डझनहून अधिक लोकांनी त्यांना घेराव घातला. पोलीस निरीक्षक विनोद कुमार यांनी त्यांची माफी मागितली पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही.

आरोपींनी त्यांची कॉलर धरून शिवीगाळ केली. आरोपींपैकी एक आशिष शुक्ला याने विनोद कुमार यांना कानाखाली मारली. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. हसनगंज पोलिसांनी रात्री उशिरा पोलिसाला मारणाऱ्या आशिष शुक्लाला अटक केली.

आरोपींनी विनोद कुमार यांचे नीट ऐकूनही घेतले नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विनोद कुमार खाली उतरल्यावर आरोपीने त्याची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारायला सुरुवात केली. आरोपी विनोद कुमार यांच्याकडून त्यांचे ओळखपत्र मागत राहिला.

आशिष शुक्लाने उघडपणे विनोद कुमार यांना मारयला सुरुवात केली. मागून एक जण त्याच्या खांद्यावर असलेले दोन स्टार काढताना दिसत होता, तिसरा पट्टा उघडण्याचा प्रयत्न करत होता. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून निघून गेल्याची माहिती निरीक्षकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या हसनगंज पोलीस ठाण्याच्या विनोद कुमार यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.

प्रभारी निरीक्षक हसनगंज अशोक सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षकांवर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी आशिष शुक्ला हा इंदिरा नगर येथील रहिवासी आहे. याशिवाय प्रांजल माथूर आणि प्रियांक माथूर हे त्याचे दोन नातेवाईक आहेत. याशिवाय या प्रकरणात आणखी एक आरोपी प्रवेंद्र यालाही अटक करण्यात आली आहे. प्रांजल, प्रियांक आणि प्रवेंद्र हे अलीगंजचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आशिषच्या मेव्हण्याचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं, त्यावेळी या लोकांनी पोलिसांसोबत उद्धटपणा केला. प्रभारी निरीक्षक अशोक सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी इन्स्पेक्टरच्या गाडीतून सामान चोरतानाही दिसत होते. अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.