वृत्तसंस्था, बंगळुरू / मॉस्को
रशियाने तब्बल पाच दशकांनी चंद्राकडे पाठविलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. मानवरहित ‘रोबो लँडर’ कक्षेत अनियंत्रित झाल्यानंतर कोसळल्याचे अवकाश संस्थेने जाहीर केले. दुसरीकडे भारताचे ‘चंद्रयान-३’ प्रकल्पातील ‘लँडर’ त्याच्या अवतरणपूर्व कक्षेत पोहोचले असून २३ तारखेला संध्याकाळी ६.०४ वाजता ‘विक्रम’चे लँडिंग होईल.
भारतीय अवकाश संशोधन संस्था, ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान ३चा ‘विक्रम’ हा लँडर हा त्याच्या अंतिम कक्षेत (२५ किमी बाय १३४ किमी) यशस्वीरीत्या स्थापित झाला असून आता २३ तारखेला त्याच्या उतरण्याच्या ठिकाणी सूर्योदय होण्याची प्रतीक्षा आहे. त्या दिवशी अंदाजे संध्याकाळी ५.४५ वाजता अवतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि ६.०४ वाजता विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’करेल, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. चंद्रयान-३ मोहिमेचे यश हे भारतीय विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल, असेही ‘इस्रो’ने म्हटले आहे. दुसरीकडे ‘चांद्रयान’च्या नंतर पाठविलेले मात्र त्याच्या आधी अवतरण करण्यासाठी सज्ज झालेले रशियाचे ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्याचे रविवारी स्पष्ट झाले. रशियन अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने दिलेल्या माहितीनुसार यान अवतरणपूर्व कक्षेत (प्री-लँडिंग) पोहोचल्यानंतर त्याचा संपर्क तुटला आणि त्यात काही समस्या निर्माण झाल्या. ‘लुना’ अनियंत्रित होऊन चुकीच्या कक्षेत गेल्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. तज्ज्ञांकडून समस्येचे विश्लेषण सुरू असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा >>>रशियाचे लुना-२५ कोसळले; चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे इतके कठीण आहे का?
वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण
‘विक्रम’चे अवतरण देशवासियांना थेट पाहता येणार आहे. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३७ वाजल्यापासून याचे थेट प्रक्षेपण वाहिन्यांवरून करण्यात येईल. दूरदर्शनच्या (डीडी) राष्ट्रीय वाहिनीसह अनेक माध्यमांवर ते उपलब्ध असेल. तसेच ‘इस्रो’चे संकेतस्थळ, यूटय़ूब वाहिनी आणि ‘फेसबुक पेज’वरही हे प्रक्षेपण केले जाईल.
हेही वाचा >>>Chandrayaan-3 चे एक पाऊल पुढे, चंद्रावर उतरण्याच्या पूर्वतयारीला झाली सुरुवात
आता स्पर्धेत भारतच..
आतापर्यंत अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत रशिया आणि चीन हे तीन देशच चंद्रावर अवतरण करण्यास यशस्वी ठरले आहेत. परंतु दक्षिण ध्रुवावर अद्याप कोणीही उतरलेले नाही. त्यासाठी भारत-रशियामध्ये स्पर्धा होती. चंद्रयानाने लांबचा मार्ग पत्करला असताना ‘लुना’ मात्र अवघ्या ११ दिवसांत चंद्राजवळ पोहोचले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे हे ध्येय होते. मात्र लुना कोसळल्यामुळे आता स्पर्धेत केवळ भारताचे चांद्रयानच उरले आहे.