नवी दिल्ली : भांडवली बाजार नियामक सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना दिलासा देताना, लोकपालांनी हिंडेनबर्ग अहवालाशीसंबंधित तक्रारी बुधवारी फेटाळून लावल्या आहेत. बुच यांच्यावरील आरोप हे ठोस पुराव्यांपेक्षा अनुमानांवर आधारित असल्याचे लोकपालांनी सांगितले.
गेल्या वर्षी माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालात करण्यात आला होता. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गेल्या वर्षी माधवी बुच यांच्या विरोधात तक्रार दाखल करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोकपालांनी माधवी बुच यांच्या विरोधातील दाव्यांचे वर्णन अस्पष्ट, निराधार आरोपांवर आधारित असल्याचे सांगून, बुच यांच्या विरुद्ध चौकशीचे आदेश देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे स्पष्ट केले. बुच यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी हिंडेनबर्ग अहवाल हा एकमेव आधार असू शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
बुच यांच्यावरील आरोप हे गृहीतकांवर आधारित आहेत, कोणत्याही पडताळणीयोग्य पुरावा नसल्याचे लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. शिवाय तक्रारदाराला स्वत:ला बुच यांच्या विरोधातील दाव्यांच्या कमकुवतपणाची जाणीव होती, तरीही ते त्यांच्या विरोधात आरोप करून दावा पुढे सुरू ठेवण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत, असेही लोकपालांनी निदर्शनास आणून दिले.
नेमके प्रकरण काय?
माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या दोन परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अध्यक्षांचे चारित्र्यहनन करत आहे, असा आरोप सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी त्यावेळी केला होता. शिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार गोपनीय नसून ते कोणालाही पाहता येतील, असेही बूच दाम्पत्याने स्पष्ट केले होते. भांडवली बाजाराकडे सादर केलेल्या निवेदनात, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले होते.