Mahakumbh : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला आहे. मौनी अमावस्येचा मुहूर्त महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी अतिशय पवित्र मानला जातो. या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात एकाच दिवशी भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. याचवेळी चेंगराचेंगरी झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली. या घटनेत ३० भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ६० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.

दरम्यान, महाकुंभमध्ये एकाच ठिकाणी चेंगराचेंगरी झाली की दोन ठिकाणी? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. महाकुंभात एकाच ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार करण्यात येत आहे. मात्र, यावर प्रशासनाकडून आधी काहीही स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. मात्र, आता महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी घटना नेमकी कशी घडली? चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली आहे.

गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर असलेल्या संगम घाटावर चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर झुशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले होते. झुशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता हा निर्णय घेतला आहे. मात्र, पोलिसांनी आधी दोन ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती झाल्याचे दावे नाकारले होते.

महाकुंभमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत एकूण किती जणांचा मृत्यू झाला असा सवाल विचारला असता डीआयजी वैभव कृष्णा यांनी ३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं. तसेच नेमकी कोणा-कोणाचा मृत्यू झाला? यासंदर्भातील यादी आज जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झुसी परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “संगम घाटावर चेंगराचेंगरी झाल्याची बातमी पसरल्यानंतर बुधवारी सेक्टर २१ क्रॉसिंगवर गोंधळ उडाला.” तसेच एका नाश्ता विक्रेत्याने म्हटलं की, “सकाळी ६.३० च्या सुमारास माझ्या चण्याच्या गाडीकडे जाताना मला सेक्टर २१ क्रॉसिंगवर मोठी गर्दी दिसली. कारण दोन्ही बाजूंनी लोक मोठ्या संख्येने येत होते. कुंभमध्ये येण्यासाठी आणि त्याच्या ठिकाणाच्या बाहेर जाण्यासाठी भाविकांसाठी एकच मार्ग असल्याने त्यामुळे गोंधळ उडाला. तसेच या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, गर्दी इतकी मोठी असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली नाही.”