S. Jaishankar : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील निर्माण झालेला तणाव सध्या काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, तरी देखील विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंत्री एस.जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी देखील मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे. मंत्री एस.जयशंकर यांना आधी सीआरपीएफ कमांडोंची झेड श्रेणीची सुरक्षा आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सीमेवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीनंतर जयशंकर यांचं सुरक्षा कवच वाढवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. असं द इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला या संदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांना दोन बुलेटप्रूफ कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निर्माण झाल्यानंतर अवघ्या जगाचं लक्ष याकडे लागलं होतं. या सर्व परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांशी संवाद साधत भारताची ठाम भूमिका मांडण्याचं काम केलं. यामध्ये रशिया, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटनसह आदी देशांच्या प्रतिनिधींशी मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधत आपली भूमिका मांडली होती.