सात नव्या कंपन्या देशाला समर्पित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : यापूर्वी कधीही नव्हती इतकी पारदर्शकता, विश्वास आणि तंत्रज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आता भारताच्या संरक्षण क्षेत्रात असून, शिथिल अशी धोरणे मोडीत काढत स्वातंत्र्यापासून या क्षेत्रात प्रथमच मोठय़ा सुधारणा होत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी शुक्रवारी सांगितले.

देशाला स्वबळावर जगातील सर्वात मोठी लष्करी शक्ती बनवण्याचे आमचे ध्येय असल्याचे मोदी यांनी सात नव्या संरक्षण कंपन्यांचे लोकार्पण करताना आत्मनिर्भर भारत मोहिमेचा संदर्भ देऊन सांगितले.

सुमारे दोनशे वर्षांपासून अस्तित्वात असलेले ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएबी) विसर्जित करून सरकारने सात सरकारी संरक्षण कंपन्या स्थापन केल्या आहेत. ४१ आयुध निर्माणींसह या बोर्डाची मालमत्ता या नव्या कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.

या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनात कौशल्य मिळवावे एवढेच ध्येय असू नये, तर ‘जागतिक ब्रँड’ बनण्याचे असावे अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. स्पर्धात्मक किंमत ही भारताची ताकद असली, तरी दर्जा आणि विश्वासार्हता ही त्याची ओळख असली पाहिजे असे ते म्हणाले.

भारताच्या संरक्षण उत्पादन वाढवण्यासाठी मोठय़ा सुधारणांचा भाग म्हणून, यापूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डातून (ओएफबी) वेगळ्या करण्यात आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील ७ नव्या संरक्षण कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला अर्पण केल्या.

या कंपन्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम विजयादशमीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता.

मदतीची तयारी- संरक्षणमंत्री

आवश्यकता भासल्यास सरकार या कंपन्यांना सुरुवातीला आर्थिक आणि वित्तेतर मदत करेल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या वेळी सांगितले. या कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून काम सुरू केले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. उत्तरदायित्व, कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी, दोनशे वर्षे जुन्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाची पुनर्रचना करून त्याचे ७ सरकारी कंपन्यांमध्ये रूपांतर करण्याच्या दीर्घ काळापासून प्रलंबित प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ जूनला मंजुरी दिली होती.

या बोर्डातर्फे दारूगोळा आणि लष्करी साहित्याचे उत्पादन करणाऱ्या ४१ कारखान्यांचे संचालन करण्यात येत होते.

१ ऑक्टोबरला ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड विसर्जित करण्यात येऊन त्याची मालमत्ता, कर्मचारी आणि व्यवस्थापन ७ कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले.

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी  भारताच्या आयुध निर्माणींची ताकद जगाने पाहिली. या कारखान्यांजवळ अधिक चांगली संसाधने आणि जागतिक दर्जाची कौशल्ये होती, मात्र स्वातंत्र्यानंतर या कंपन्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे देशाचे संरक्षण क्षेत्रात परदेशांकडून होणाऱ्या पुरवठय़ावर अवलंबित्व वाढले होते.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major reform in defence sector pm says narendra modi zws
First published on: 16-10-2021 at 02:45 IST