दोन महिन्यांच्या कालावधीनंतर उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडण्याक आली आहेत. यात अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर, दिल्लीतील प्रसिद्ध छतरपूर मंदिर आणि उत्तराखंडमधील अनेक मंदिरांचा समावेश आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमीमंदिर दररोज सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायं. ६ या वेळेत खुले राहणार आहे. टाळेबंदीच्या सध्याच्या टप्प्यात अधिकाऱ्यांनी भाविकांची संख्या एका वेळी पाचपुरती मर्यादित केल्याने पहिल्या दिवशी फार कमी भाविक दर्शनासाठी आले होते.

दिल्लीतील प्रसिद्ध छतरपूर मंदिर परिसर सकाळी पावणेनऊच्या सुमारास उघडण्यात आले. पहिल्या तासाभरात सुमारे ३०० भाविकांनी दर्शन घेतले.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असलेल्या संचारबंदीमुळे जामा मशीद पहिल्या नमाजासाठी उघडण्यात आली नाही, असे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी सांगितले.

चारधाम बंदच

उत्तराखंडमधील बहुतांश मंदिरांची दारे सोमवारी भाविकांसाठी खुली झाली. गढवाल हिमालयातील प्रसिद्ध चारधाम आणि डेहराडून महापालिकेच्या हद्दीतील मंदिरे मात्र अद्याप उघडलेली नाहीत.

बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री यांसह चारधाम खुले भाविकांसाठी खुले करण्याबाबतचा निर्णय पुजारी व इतर संबंधितांना विश्वासात घेतल्यानंतर एक-दोन दिवसांत घेतला जाईल, असे देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमण यांनी सांगितले.