प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानं नव्या वादानं तोंड वर काढलं आहे. झालेल्या हिंसाचारावरून सरकारनं शेतकऱ्यांवर ठपका ठेवला आहे. त्याचबरोबर सरकारकडे बहुमत असून, त्याच बळावर संसदेत कायदे करण्यात आल्याचा युक्तीवादही सरकारकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त केला.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी नव्या कृषी कायद्यावरून सरकारला सुनावलं. आपल्याकडे बहुमत आहे आणि कृषी कायदे संसदेत मंजुर करण्यात आहेत, असं केंद्र सरकारकडून सांगितल जात आहे… या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बहुमत तुम्हाला लोकांच्या हत्या करण्याची परवानगी देतं नाही. इतकंच नाही तर राजीव गांधी यांच्याकडेही बहुमत होतं. कृषी कायदे घाईत गडबडीत आणले गेले आहेत. करोना काळात आवाजी मतदानानं हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत. इतरांपेक्षा मला संसदेबद्दल चांगली माहिती आहे. ते (मोदी सरकार) कृषी कायदे मागे का घेत नाहीये? त्यात काय धोका आहे? मी केंद्र सरकारला विनंती करते की कृषी कायदे रद्द करावेत, असं आवाहनही ममता यांनी केंद्राला केलं आहे.

आणखी वाचा- दिल्ली हिंसाचार : …तर असं काही घडलंच नसतं – शरद पवार

आणखी वाचा- “कुणी लाल किल्ल्यावर पोहचतं आणि पोलिसांची एक गोळी देखील चालत नाही…”

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांवर आरोप होत आहेत. याविषयी ममता बॅनर्जी म्हणाल्या,”ही लोकप्रिय चळवळ आहे आणि शेतकऱ्यांनी परत जाण्याच्या मताशी मी सहमत नाही. हे केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं अपयश नाही का? ही घटना चुकीच्या वाईट पद्धतीनं हाताळण्यात आली नाही का? केंद्र सरकारनं अधिक काळजी घ्यायला हवी होती. माझे पंजाबमधील भाऊ आणि बहिणी एकजूट झाल्या आहेत. देशाच्या इतर भागातही हेच दिसत आहे. उद्धव ठाकरे, एम. के. स्टॅलिन आणि अरविंद केजरीवाल काय म्हणत आहे बघा. आम्ही सर्वजण एकजूट आहोत,” असं ममता यांनी यावेळी स्पष्ट केलं. “मी हिंसेचं समर्थन करत नाही. मी शांततापूर्ण आंदोलनाच्या बाजूने असते. मी २६ वेळ अन्नत्याग उषोपण केलं आहे. शेतकऱ्यांनी ध्वज फडकावल्याच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. ज्या व्यक्तीने तो ध्वज फडकावला, त्याचा अमित शाह यांच्यासोबत फोटो आहे. तो भाजपाशी सलग्नित आहे,” असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.