मानवी मूत्रापासून खते व पाणी तयार करण्यासाठी वैज्ञानिकांनी सौरऊर्जेवर आधारित यंत्र तयार केले असून, हे पाणी नंतर बीअर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांकरिता वापरता येते. बेल्जियम येथील एका विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी सौरऊर्जा वापरून मानवी मूत्र गरम केले व ते गोळा करून एका टाकीत भरले.
मूत्राचे बाष्पीभवन झाल्यानंतर ते विशिष्ट पारपटलातून काढले. हे पारपटल वेगळय़ाच यंत्रात पाणी गोळा करते, असे टेकप्लोर या नियतकालिकाने म्हटले आहे. त्यातील अतिरिक्त पदार्थ निघून जाऊन ते पाणी पिण्यालायक असते. त्यातील ९५ टक्के अमोनिया निघून गेलेला असतो. अनेक लोक या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणार नाहीत हे माहीत असल्याने त्यांनी मूत्राचे नमुने देण्यास नकार दिला. वैज्ञानिकांच्या मते यातून पुढे पाणी व खते तयार करता येतात, कारण मूत्रामधून फॉस्फरस, पोटॅशियम व नायट्रोजन वेगळा काढता येतो, ते पिकांना लाभदायी असतात. बीअर ज्या पिकांपासून बनवली जाते त्या पिकांना या रासायनिक घटकांचा फार चांगला उपयोग होतो.
गाळण यंत्र तयार करण्याच्या उद्देशाने हे संशोधन सुरू केले होते, पण ग्रामीण भागात पाणी कमी असल्याने तेथे पाण्यासाठीही त्याचा वापर करता येईल. क्रीडासंकुले व संगीतमहोत्सवाची ठिकाणे व विमानतळे येथे हे यंत्र वाहून नेणे सहज शक्य आहे.
हे यंत्र ऊर्जा कार्यक्षम म्हणजे सौरऊर्जेवर चालणारे आहे. सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या इतर यंत्रांपेक्षा ते चांगले असून त्यांचे अनेक फायदे आहेत.