तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात डोक्याला गोळी लागून जखमी झालेल्या मलाला युसूफझई या पंधरा वर्षीय पाकिस्तानी मुलीची येथील रुग्णालयातून मुक्तता करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार केल्याबद्दल तिच्यावर स्वात खोऱ्यात ९ ऑक्टोबरला हल्ला करण्यात आला होता. उपचारासाठी तिला १५ ऑक्टोबरला विमानाने लंडनला आणण्यात आले होते. तिच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात गोळी घुसली होती. हल्ला करण्यात आला होता. तिच्यावर येथील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलाला तिच्या कुटुंबियांबरोबर येथील वेस्ट मिडलॅंड भागात राहणार असून, तिच्यावर लवकरच एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे तिला जानेवारीअखेरीस वा फेब्रुवारीत पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. दरम्यान, तिच्या नैमेत्तिक तपासण्या करण्यात येतील. तिच्या तब्येतीत झपाटय़ाने सुधारणा होत आहे.