बंगळुरू : कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. २४ वर्षांनी गांधी परिवाराचे सदस्य नसलेले ते पहिले काँग्रेस अध्यक्ष ठरले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख टीकाकार असलेल्या खरगे यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजिलगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. खरगे यांना पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्रिपदाचे मोठे दावेदार म्हणून पाहिले जात होते. परंतु ते कधीही या पदावर पोहोचू शकले नाहीत. स्वभावाने सौम्य असलेले खरगे हे आतापर्यंत फारसे मोठय़ा वादाच्या भोवऱ्यात अडकले नाहीत.
वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी असून, कलबुर्गी येथे बांधलेल्या बुद्ध विहार संकुल उभारणाऱ्या सिद्धार्थ विहार विश्वस्त मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. खरगे यांचा विवाह १३ मे १९६८ रोजी झाला. राधाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव असून, त्यांना दोन मुली व तीन मुलगे आहेत. त्यांना एक मुलगा प्रियांक खर्गे कर्नाटकात आमदार व मंत्री आहे. सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला. १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसप्रवेश केला. गुलबर्गा शहर काँग्रेस समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. २०१९ पर्यंत खरगे निवडणुकीच्या िरगणात अजिंक्य होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही त्यांनी गुलबर्गा येथून ७४ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या िरगणात उतरण्यापूर्वी त्यांनी गुरमितकल विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा विजय मिळवला. गुलबर्गा येथून ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुलबर्गा येथे भाजप नेते उमेश जाधव यांच्याकडून खरगे यांचा ९५ हजार ४५२ मतांनी पराभव झाला. कर्नाटक या त्यांच्या राज्यात ‘सोलिल्लादा सरदारा’ (कधीही हार न मानणारा नेता) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरगे यांचा अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिला पराभव होता.
प्रशासक म्हणून ते अनुभव समृद्ध
खरगे यांनी अनेक मंत्रालये हाताळली, त्यामुळे प्रशासक म्हणून ते अनुभव समृद्ध आहेत. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती प्रमुख म्हणून काम केले होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. खरगे हे २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेत काँग्रेसचे नेते होते, जरी ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते होऊ शकले नाहीत. कारण काँग्रेस खासदारांची संख्या सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात कन्नड अभिनेते राजकुमार यांचे कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने अपहरण केले होते. त्या काळात कावेरी पाणी वादानेही जोर धरला होता. या दोन्ही मुद्दय़ांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत गुलाम नबी आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली होती. कर्नाटकातील राजकारणात जेव्हा ‘संभाव्य दलित मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचे नाव चर्चेत येत असे, तेव्हा ते आपली ‘दलित’ अशी ओळख करून देण्यापेक्षा मी काँग्रेसजन आहे, असे सांगण्याचा आग्रह धरत. पुढील वर्षी कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत राज्यातील पक्षनेतृत्व व कार्यकर्त्यांना त्यांच्या अध्यक्षपदामुळे नवी उमेद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
धर्माध शक्तींना पराभूत करेल : थोरात
काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्माध, हुकूमशाही शक्तींना पराभूत करेल, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल: अशोक चव्हाण
नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्र व राज्य पातळीवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या निष्ठावान नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल व काँग्रेस पक्ष समर्थपणे सर्व आव्हानांना सामोरा जाईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
सोनिया, राहुल गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांकडून अभिनंदन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोनिया गांधी दहा राजाजी मार्गावरील खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्राही होत्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी खरगे यांचे या विजयाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की पक्षातील ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी खरगे यांचा प्रचंड अनुभव व वैचारिक बांधिलकी उपयोगी पडेल. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी खरगेंचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा नक्कीच मजबूत होईल, अशी आशा व्यक्त केली. प्रियंका गांधी यांनी खरगेंना उद्देशून ‘ट्वीट’ केले, की मला खात्री आहे की आपल्या राजकीय जीवनाचा दीर्घ व थेट अनुभव काँग्रेसची विचारधारा मजबूत करेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, की खरगे यांचा विजय हा व्यक्तिगत अभिमानापेक्षा वैचारिक बांधिलकी ठेवणाऱ्या प्रवृत्तीचा विजय आहे.
खरगे यांच्या निवडीचे मुंबईत जल्लोषात स्वागत
मुंबई : काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाल्याचे जाहीर होताच, प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोकशाही पद्धतीने अध्यक्षाची निवड करणारा देशातील काँग्रेस हा एकमेव पक्ष असून, खरगे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी व्यक्त केला. खरगे यांच्या निवडीची घोषणा होताच, प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन व गांधी भवन, तसेच मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.