आम्ही कोणाही समोर झुकणार नाही पश्चिम बंगालमध्ये तर हिंदू समाजाला भामट्या हिंदूंकडून त्रास सहन करावा लागतो आहे, अशी खरमरीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. आम्ही सिंगूर कमिशनप्रमाणेच २१ जुलैला झालेल्या घटनेसाठीही कमिशन स्थापलं आहे. आमच्या विरोधात भाजपनं षडयंत्र आखल आहे हेदेखील आम्हाला ठाऊक आहे असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे, शुक्रवारी झालेल्या एका रॅलीदरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. सध्याच्या घडीला राज्यातलं आणि देशातलं वातावरण हे आणीबाणीपेक्षाही वाईट आहे, सामान्य माणसांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. भाजप हा एक भ्रष्ट पक्ष आहे, ईडी किंवा सीबीआयचा उपयोग गुजरात किंवा उत्तर प्रदेशातल्या सरकारविरोधात केला जात नाही, फक्त टीएमसी किंवा राजदसारख्या पक्षांची बदनामी करण्यासाठी केला जातो असंही ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या टीकेमुळे पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातला वाद समोर आला आहे. आम्हाला आणि आमच्या पक्षाला कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, देशातल्या सर्वात स्वच्छ प्रतिमा असलेल्या पक्षांपैकी एक पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस आहे. आम्ही भाजपप्रमाणे भ्रष्ट पक्ष नाही अशीही टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुका भाजपला जड जाणार आहेत, बंगालमध्ये जिंकणं भाजपसाठी कठीण असणार आहे असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. गोरक्षकाच्या नावाखाली गोभक्षक देशात तयार झाले आहेत, आम्ही काय खायचं? काय नाही? अंडंही खायचं नाही का? हे सगळं जर भाजप सरकार ठरवणार असेल तर आम्हाला असं सरकार केंद्रात नकोच आहे असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
९ ऑगस्टपासून आम्ही ‘भाजप भारत छोडो’ आंदोलन सुरू करणार आहोत. नोटाबंदीचा निर्णय हा या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा आहे कारण याद्वारे अनेक जुन्या नोटा या काही ठराविक लोकांच्या खिशात गेल्या आणि गरीब गरीबच राहिले कोणताही काळा पैसा बाहेर आला नाही. देशाचा विकासदर वाढवण्यातही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. देशातले शेतकरी आत्महत्या करत आहेत याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? मोदी सरकार हे फेल सरकार आहे त्यांच्या षडयंत्रांकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.