पश्चिम बंगालमधील लष्कराच्या उपस्थितीवरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘बंगालमध्ये लष्कराच्या मदतीने सरकार उलटवून टाकण्याचा प्रयत्न होत आहे’, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या विरोधात टिकेची झोड उठवली आहे. राजकीय फायद्यासाठी लोकांना त्रास दिला जातो आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधाचा आवाज बनले असताना अशाप्रकारे लष्कराच्या मदतीने सरकार बदलण्याचा प्रयत्न होतो आहे. मी लोकांसाठी आवाज उठवते आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने रस्त्यांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे, तसे इतरत्र कुठे तैनात करण्यात आले आहे ? ते मणीपूर, आसाम, नागालँडमध्ये लष्कर तैनात केल्याचे सांगतात. मात्र त्यांच्या दाव्याची पडताळणी अद्याप कोणीही केलेली नाही. मणीपूर आणि नागालँड राज्यातील स्थिती फारशी चांगली नसल्याने लष्कर तिथे कायमच लष्कराची उपस्थिती असते. आसाममध्ये भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे आसाममधील सत्य काय आहे, याची कल्पना नाही,’ अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘फक्त बंगालमध्येच लष्कर का तैनात करण्यात आले आहे ? ओडिशा आणि बिहारमध्ये का तैनात करण्यात आले नाही ? आम्ही तेथील लोकांशी बोललो आहोत, तेथील परिस्थिती अगदी नेहमीसारखी आहे. कदाचित केंद्र सरकार तेथेही नंतर लष्कर तैनात करेल. ज्या ठिकाणी ते विरोधात असतील, तिथे हाच प्रयोग केला जाईल,’ अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींनी संताप व्यक्त केला. ‘मला लष्कराविषयी अत्यंत अभिमान आहे. मात्र भाजपकडून लष्कराचा राजकीय कारणांसाठी गैरवापर सुरू आहे,’ अशी गंभीर टीका बॅनर्जी यांनी केली आहे.

‘राज्य सरकारला कोणतीही पूर्वकल्पना न देता लष्कर तैनात केले आहे. हे राज्य घटनेच्या विरोधात आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा हा डाव आहे,’ असा आरोपदेखील ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता बॅनर्जींच्या आरोपाला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सैन्याचा दैनंदिन सराव आता ममतांना राज्य सरकार उलथवण्याचा कट वाटू लागला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान झाल्यापासून ममतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,’ असे प्रत्युत्तर भाजप नेते सिद्धार्थ नाथ यांनी दिले आहे

लष्कराने मात्र पश्चिम बंगालमधील त्यांची उपस्थिती हा नित्यक्रमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले. ‘ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आम्ही नेहमीच या प्रकारचा सराव करतो. आसाममधील १८ ठिकाणी, अरुणाचल प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील १९, मणीपूरमधील ६, नागालँडमधील ५, मेघालयातील ५, तर त्रिपुरा आणि मिझोराममधील प्रत्येकी एका ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत,’ अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

दरम्यान पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, गृह सचिव, कोलकाता पोलीस आयुक्त यांनी लष्कर तैनात करण्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee army deployment nh 2 in west bengal military coup
First published on: 02-12-2016 at 09:15 IST