राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) मुद्यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

विजयवर्गीय यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान नाहीत. एनआरसी लागू करण्याचा निर्णय घ्यायचा की नाही, हे केंद्र सरकार ठरवणार आहे. त्या का याची फार चिंता करत आहेत. जर केंद्राने एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेतला तर, त्या यामध्ये काहीच करू शकणार नाहीत, कारण हा केंद्र सरकारचा निर्णय असणार आहे.

ममता बॅनर्जी यांनी या अगोदर एनआरसीच्या मुद्यावरून ”कोणालाही त्यांच्या राज्याच्या बाहेर काढले जाऊ शकत नाही. तसेच, एनआरसीमुळे पश्चिम बंगालमधील शांततेचा भंग होईल. बंगालमध्ये एनआरसीचा आवश्यकता नाही व नक्कीच या राज्यात एनआरसी लागू होणार नाही. माझे असे मत आहे की सर्व धर्मांमधील कोणत्याही नागिरकाने आपले स्थान सोडू नये, मग तो बंगाली असो किंवा मग अन्य कोणत्याही धर्माचा.” असे म्हटले होते.

तसेच बॅनर्जी यांनी हे देखील म्हटले होते की, जर आम्ही इथे मतदान करत असू तर इथे राहणं हा आमचा अधिकार आहे. बंगाल शांततेचे ठिकाण आहे. एनआरसीमुळे बंगालमधील शांतता नष्ट होऊ शकते. मी याचा तीव्र विरोध करते. बॅनर्जी यांच्या या विधानवरूनच भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.