ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातल्या दोन मंत्र्यांना आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं आहे. फिरहाद हकीम आणि सुब्रता मुखर्जी यांना भ्रष्टाचाराच्या अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनीही सीबीआयच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोघांबरोबरच सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि कोलकत्त्याचे माजी महापौर सोवन चटोपाध्याय यांनाही अटक केली आहे. या चौघांनाही कोलकत्त्याच्या त्यांच्या घरामधून ताब्यात घेण्यात आलं. या चौघांविरोधात दाखल झालेल्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनकर यांनी या चौघांच्या अटकेला मंजुरी दिली.

ह्या चौघांनाही एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यावेळी हे राज्यमंत्री होते. २०१६च्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबर आधी हे प्रकरण उघड करण्यात आलं. मार्च २०१७मध्ये कोलकत्ता उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकऱणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांची चौकशी कऱण्यात येईल.

मला अटक झाली आहे. आम्ही याविरोधात कोर्टात लढणार आहोत, असं फिरहाद हकीम यांनी अटकेनंतर सांगितलं.

हेही वाचा- मोदींच्या लोकप्रियतेलाही बसला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; पहिल्यांदाच ग्राफ ५० टक्क्यांच्या खाली

ही बातमी कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते यांनी सीबीआयच्या कार्यालयाकडे धाव घेतली. तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर निदर्शने करायला सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसने या निदर्शनांच्या माध्यमातून ही अटक राजकीय उद्देशाने झालेली असल्याचा आरोप केला आहे.

वकील आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमन बंडोपाध्याय याविषयी म्हणतात, “एक वकील म्हणून सांगत आहे की हे बेकायदेशीर आहे. एखाद्या आमदाराला अटक कऱण्यापूर्वी राज्याच्या विधानसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते. सीबीआयकडे केवळ राज्यपालांची परवानगी आहे.”

तर तृणमूलचे लोकसभेचे खासदार सौगाता रॉय या अटकेबद्दल म्हणतात, “हे राजकीय उद्देशाने केलेलं कृत्य आहे. निवडणुकीत हरल्याने पक्षाने आता मंत्री आणि आमदारांना अटक कऱण्यासाठी सीबीआयची मदत घेणं सुरु केलं आहे.”

तर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष सांगतात, “भाजपाचे सध्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांच्याविरोधात गुन्हा का नोंदवण्यात आला नाही? रॉय यांनी माजी आयपीएस अधिकारी मिर्झा यांच्याकडून पैसे घेतले होते. तसंच सध्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना का नाही अटक झाली? त्यांनीही पैसे घेतल्याचे कित्येक पुरावे समोर आले आहेत. याचं कारण म्हणजे हे दोघेही भाजपामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना संरक्षण मिळालं आहे. हे केवळ अपयशाचा बदला घेण्यासाठी कऱण्यात आलेलं आहे…बाकी काही नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee reaches to cbi office after ministers arrest vsk
First published on: 17-05-2021 at 12:53 IST