विम्याची ५० कोटींची रक्कम उकळण्यासाठी वडिलांना अपघात करुन ठार केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या हापुड या जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने हापुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. एका रस्ते अपघाताचं प्रकरण ही दुर्घटना नाही तर यामागे विम्याचे ५० कोटी उकळण्याचा कट असू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे. मुकेश सिंघल यांचा अपघाती मृत्यू झाला. पण हा मृत्यू घडवून आणला गेला आहे असं कंपनीने म्हटलं आहे. यानंतर मुकेश सिंघल यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

मृत्यू झालेले मुकेश सिंघल यांनी विविध कंपन्यांचे वीमा उतरवले होते. आदित्य बिर्ला, बजाज अलायन्स, एचडीएफसी एर्गो, मॅस्क लाइफ, टाटा एआयजी, टाटा एआयए अशा कंपन्यांचे वीमा मुकेश सिंघल यांनी उतरवले होते. मुकेश सिंघल यांचं वार्षिक उत्पन्न ६ ते ७ लाख रुपये होतं. पण त्यांनी ५० कोटींचं वीमा कव्हरेट केलं होतं. याच रकमेसाठी त्यांची हत्या करुन अपघात आहे असं भासवण्यात आलं असा आरोप कंपनीने केला आहे. त्यांचा वारस असलेल्या विशालने रक्कम मिळण्यासाठी अर्ज भरला. त्यानंतर कंपनीने क्लम पूर्ण करण्याच्या तयारीत असताना अनेक चुकीच्या गोष्टी पकडल्या. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं.

विमा कंपनीने काय प्रश्न उपस्थित केले आहेत?

कंपनीच्या तक्रारीनुसार २७ मार्च २०२४ ला मुकेश सिंघल हे गंगा भागातून त्यांच्या बाईकवर परतत होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या ओळखीचा एकजण बसला होता जो रस्त्यात उतरला. त्यानंतर एका अज्ञात वाहनाने मुकेश यांना धडक दिली. या अपघातानंतर त्यांना मेरठच्या आनंद रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेडिकल रेकॉर्ड आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्ट यांच्यात विरोधाभास आढळून आला. वीमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अपघात दिवसा झाला. तर रुग्णालयाच्या अहवालांनुसार अपघात रात्री ८ च्या दरम्यान झाल्याची नोंद आहे. तसंच अपघातात ज्या जखमांचा उल्लेख करण्यात आला त्या जखमांबाबत वीमा कंपनीकडे वेगळी नोंद आहे आणि रुग्णालयात वेगळी. अशा सगळ्या त्रुटी आढळल्याने वीमा कंपनीचा संशय बळावला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

साक्षीदार आणि कागदपत्रांवरही संशय

तपासात हे समोर आलं आहे की साक्षीदार पैसे देऊन आणलेले असू शकतात. कारण त्यांच्या आधार आणि पॅन कार्ड्समध्ये विसंगती आढळून आली. ज्या वाहनाने मुकेश यांच्या दुचाकीला टक्कर दिली त्याचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा ओळख याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही.विमा कंपन्यांचा आरोप हादेखील आहे की वारस विशालने तपासात काहीही सहकार्य केलं नाही. तसंच आवश्यक कागदपत्रं सादर केली नाहीत. एवढंच नाही ५० कोटी लवकर मिळावेत म्हणून एका अधिकाऱ्याला लाच देण्याचाही प्रयत्न विशालने केला अशी माहिती पोलीस अधिकारी देवेंद्र बिष्ट यांनी दिली. या प्रकरणात विशाल आणि त्याचा मित्र सतीश या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीही लोकांचा सहभाग असू शकतो अशी शक्यता आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.