दिल्लीतील एका २० वर्षीय तरुणाने गेल्या आठवड्यात त्याच्याच एका मित्राचा क्रूरपणे गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली होती. तो मित्र ज्या महिलेपासून दूर राहण्यास सांगितले होते तिच्याशी बोलताना पाहिल्यानंतर आरोपीने हे टोकाचे पाऊल उतलले. दरम्यान या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.
आरोपीचे नाव अक्षत शर्मा असे असून तो पांडव नगर येथील रहिवासी आहे. गुरूवारी रात्री उशीरा त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. शर्मा हा आयस्क्रिम विक्रेता म्हणून काम करतो आणि सध्या तो मुक्त विद्यापीठातून बीकॉमचे शिक्षण घेत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जुलै रोजी घडली आणि जेव्हा पांडव नगर पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याची मेडिको-लिगल केस (एमएलसी) नोंदवण्यात आली तेव्हा उजेडात आली.
नेमकं काय झालं?
पीडित हर्ष भाटी हा एका मैत्रिणीबरोबर उभा होता जेव्हा अक्षत शर्मा अचानक तेथे आला आणि त्याने ब्लेडने त्याचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर शर्मा हा घटनास्थळावरून लगेच पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर १०९ (१) आणि ३५१ (२) या भारतीय न्याय संहितेच्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
शर्मा याच्या मनात भाटी जेव्हापासून त्या महिलेशी बोलू लागला होता तेव्हापासून संताप आणि इर्षा निर्माण झाली होती, तो या महिलेत भावनिकरित्या गुंतलेला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शर्माने भाटी याला अनेकदा त्या महिलेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला पण त्याने या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.
शर्मा याचा त्याच्या घरी शोध घेण्यात आला मात्र तो तेथून आधीच पळून गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिस पथकांनी माहिती गोळा करण्याचे प्रयत्न तीव्र केले आणि आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली.
“रात्री मिळालेल्या एका गुप्त माहितीवरुन पोलिसांना आरोपी (गुरुवारी) घरी परतणार असल्याची खबर मिळाली. अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि आरोपी घरी पोहोचताच त्याला पकडले. चौकशीदरम्यान त्याने हल्ल्यात सहभागी असल्याची कबुली दिली, अशी माहिती पूर्व दिल्लीचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) अभिषेक धानिया म्हणाले.