man arrested for posting video against PM Modi Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. यादरम्यान या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केल्याच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसांनी एका इलेक्ट्रिशियनला अटक केली आहे. अधिकार्यांनी मंगळवारी याबद्दल माहिती दिली आहे.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून या इलेक्ट्रिशियनचे नाव नवाज (२५) आहे आणि तो मंगम्मनपाल्य येथील रहिवासी आहे. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली असून त्याची रवानगी बेंगळुरू मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याने एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी करत तो व्हिडीओ ‘पब्लिक सर्व्हंट’ नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला.
व्हिडीओमध्ये काय होतं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवाजने पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, “आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर अजून कसे बॉम्ब का पडले नाहीत? जेव्हा लोक शांततेत राहत होते तेव्हा मोदींनी ही युद्धसदृश परिस्थिती तयार केली आहे. त्यांच्या निवासस्थानावर पहिल्यांदा बॉम्ब टाकले पाहिजेत.” या प्रकरणाची गंभीर दखल घेत बांदेपाल्या पोलीसांनी एफआयआर दाखल केला आणि आरोपीला शोधून काढले.
याआधी कर्नाटक पोलिसांनी ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात मेसेज पोस्ट केल्याबद्दल एका पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यीनीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते.
मंगळुरू शहरातील कोनाजे पोलिसांनी या प्रकरणात रविवारी एका तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेलालू येथील रहिवासी असलेल्या रेश्मा एन बारिगा यांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानात केलेल्या कारवाईवर टीका करणारी पोस्ट इंस्टाग्रामवर लिहिली होती.