Man attacked Delhi CM Rekha Gupta has 9 cases against him : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी (२० ऑगस्ट) एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर दिल्ली पोलिसींनी राजेश खिमजी साक्रिया याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, साक्रिया हा गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात एकाच पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत. यापैकी बहुतेक हे दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचे, तर काही गुन्हेगारी धमकी आणि हल्ला केल्याचे असे आहेत.
साक्रिया याची आई भानू साक्रिया ही देखील राजकोट येथील अजी दाम पोलीस ठाण्याच्याच्या जवळ राहते. तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की तिचा मुलगा हा श्वान प्रेमी आहे आणि नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रशासनाला सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिल्यामुळे तो नाराज होता.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना भानू साक्रिया यांनी सांगितले की, “तो रविवारी दिल्लीला गेला होता आणि तेथे सोमवारी पोहचला. त्याच्या वडिलांनी जेव्हा तो कुठे आहे विचारले तेव्हा राजेश म्हणाला की तो श्वानांसाठी दिल्लीला गेला आहे.” ३६ वर्षीय राजेश त्याचे वडील आणि भाऊ हे सर्वजण राजकोट येथे रिक्षा चालवतात.
हल्ला का केला?
मुलाने मुख्यमंत्री गुप्ता यांना का कानशिलात लगावली असे विचारले असता राजेशची आई म्हणाली. “त्याचे मन तसेच आहे. तो कोणालाही मारेल. त्याने मलाही मारले आहे आणि त्याच्या पत्नीलाही मारले आहे. त्याला मानसिक आजार आहेत पण तो कोणतेही औषध घेत नाही. श्वानांचा मुद्दा ऐकून त्याला इतका संताप आला की त्याने रागाच्या भरात बेडवर आदळाआपट करून जवळजवळ तो बेड मोडला.”
राजकोट शहराचे डीसीपी जगदीश बांगरवा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की , “त्याच्या आईच्या मते, राजेश साक्रिया हा प्राणीप्रेमी असल्याचे दिसून येते आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तो व्यथित होता. तो राजकोटमध्येच राहतो, परंतु कुत्र्यांच्या प्रकरणामुळे तो दिल्लीला गेला आहे.”
साक्रियाने याने त्याच्या नातेवाईकाची तुरुंगातून सुटका करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला का? याचा देखील पोलिसांनी तपास केला. याबद्दल डीसीपी बांगरवा म्हणाले की, “आम्ही तपास केला पण साक्रीयाचा तुरुंगात कोणताही नातेवाईक नाही.”
पण राजकोट पोलिसांचा साक्रिया याच्याशी अनेकदा संबंध आला आहे. इंडियन एक्सप्रेसने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार त्याच्या विरोधात २०१७ आणि २०२२ या दरम्यान ९ गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे राजकोटमधील भाक्तीनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.