Crime News : एक व्यक्ती बनeवट कागदपत्रे आणि खोटी ओळख घेऊन कितीतरी वर्ष खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत राहिल्याची धक्कादायक बाब एका मृत्यूनंतर उजेडात आली आहे. या डॉक्टरचे हे रहस्य अजून कितीतरी वर्ष असेच लपून राहिले असते, मात्र मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका रेल्वे आधिकाऱ्याने आईच्या मृत्यू झाला आणि त्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरबद्दल जाणून घेण्याची तसदी घेतली.यानंतर जे समोर आलं त्याने सर्वानांच धक्का बसला.

ही घटना मार्बल सिटी रुग्णालयात घडली असून येथे रेल्वे अधिकारी मनोज कुमार यांनी त्यांच्या आईला उपचारासाठी दाखल केले होते. आईची प्रकृती खालवल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची अवश्यकता असल्याचे कथित डॉक्टरने सांगितले. मात्र रुग्णालयाच्या रेकॉर्डसनुसार कुटुंबाने व्हेंटिलेटर लावण्यास नकार दिल्याचा दावा करण्यात आला. ही बाब मनोज यांनी जोरकसपणे नाकारली आहे.

उपचारादरम्यान विसंगती आढळून आल्यानंतर मनोज यांनी त्यांच्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरबद्दल माहिती घेण्यास सुरूवात केली. ज्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. जो व्यक्ती स्वतःला डॉक्टर ब्रिजराज उईके असल्याचे सांगत होता तो सत्येंद्र निषाद निघाला. त्याने डॉक्टर बनण्यासाठी खोटे नाव धारण केले होते.

तपासकर्त्याने सांगितलं की, सत्यंद्र याने त्याच्या वर्गमित्र असलेल्या कटनी येथे पेंटर म्हणून काम करणाऱ्या खऱ्या ब्रिजराज उईके याची १२वीची मार्कशीट आणि इतर कागदपत्रे चोरली आणि २०१८ मध्ये आदिवासी कोट्याअंतर्गत एमबीबीएससाठी प्रवेश मिळवण्याकरिता त्यांचा वापर केला.

ज्यांची कागदपत्रे चोरीला गेली होती त्या ब्रिजराज उईके यांनी सांगितलं की, “त्याने आणि मी कटनीमध्ये बारावीचे शिक्षण घेतले, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आणि माझे नाव कोणीतरी डॉक्टर म्हणून वापरत आहे हे ऐकून मला धक्का बसला. मी २०१२ मध्ये माझे कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार केली होती.”

चोरलेल्या कागदपत्रांच्या मदतीने सत्यंद्रने वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला इतकेच नाही तर एमबीबीएस उत्तर्ण देखील झाला, त्यानंतर मेडिकल काउंसील ऑफ इंडिया (एमसीआय) नोंदणी केली आणि पुढे सुपर-स्पेशलायजेशन देखील केले. त्यानंतर तो दोन वर्ष सरकारी रुग्णालयात नोकरी करत होता. त्यानंतर त्याने खाजगी रुग्णालयात काम करणे सुरू केले. हे सर्व त्याने ब्रिजराज बनून केले.

जबलपुरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (सीएमएचओ) डॉक्टर संजय मिश्रा म्हणाले की, “प्रत्येक नोंदणीकृत रुग्णालयाने वैध डॉक्टरांची प्रमाणपत्रे सादर करायला हवीत. या प्रकरणात १२वीच्या गुणपत्रीकेपासून गैरप्रकार दिसून आला आहे. आम्ही विद्यापीठ आणि एमसीआयकडून प्रमाणपत्र तपासून घेतली आहेत. पण जर ती कागदपत्रे आधीपासूनच बनावट असतील तर गैरप्रकार ओळखणे अवघड होऊन जाते. आता पोलीस कारवाई आवश्यक आहे.”

ओमती पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतले आहे, त्यांनी फसवणुक, बनावेगिरी, आणि दुसऱ्याची ओळख वापरणे आणि आरक्षणाच्या लाभांचा गैरवापर अशा विविध आयपीसी कलमांच्या अंतर्गत गु्न्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर पोलिस अधीक्षक (सीएसपी) सोनू कुरमी म्हणाले की, “आम्हाला रेल्वे अधिकारी मनोज कुमार याच्याकडून मार्बल सिटी रुग्णालयात आईच्या मृत्यूनंतर संशय आल्यानंतर एक तक्रार मिळाली. जेव्हा त्यांनी डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना डॉक्टर बनावट असल्याचा संशय आला. आमच्या तपासात रुग्णांवर उपचार करणारा माणूस सत्येंद्र निषाद असल्याचे सिद्ध झाले. त्याने नीट उत्तीर्ण करण्यासाठी आणि एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी त्याचा मित्र ब्रिजराजच्या बनावट कागदपत्रांचा वापर केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सध्या फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे आहे.”