बायकोशी वाद झाल्यानंतर राग अनावर झाल्याने एकाने रस्त्यावरील कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना बडोद्यात घडली आहे. अजय त्रिवेदी असे त्याचे नाव असून तो सुभानपुरा येथील सन हरी अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्यावर बडोदा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अजय त्रिवेदी याचा शनिवारी बायकोशी वाद झाला होता. यामुळे तो अस्वस्थ झाला होता. याच निराशेतून त्याने रात्री दहाच्या सुमारास इमारतीच्या कुंपणात भटकणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला घरी आणले. त्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार पाहून शेजारचेही काही वेळ अस्वस्थ झाले. त्यातील काही जणांनी परिसरातील प्राणीमित्र समीर सोनी यांना या घटनेबाबत माहिती दिली. सोनी त्रिवेदी यांच्या घरी आले. अशा प्रकारचे वर्तन पुन्हा करणार नाही, अशी हमी त्रिवेदी यांच्याकडून घेतली. तसेच त्यांना माफीही मागायला लावली. पण प्राण्यांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या नेहा पटेल यांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यांनी सोमवारी त्रिवेदी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. नेहा पटेल या ‘एसपीसीए’ या प्राण्यांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी आहेत. जेव्हा मला या घटनेबद्दल समजले, त्यावेळी लगेच मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. क्रूर कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माफी मागितली म्हणून सोडणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. आम्ही तक्रार दाखल करून घेतली असून, त्रिवेदीला अटक करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे हेड कॉन्स्टेबल मनोज राठोड यांनी दिली. त्रिवेदीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.