श्रद्धा वालकर आणि निक्की यादव यांच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. खुनाच्या या दोन्ही घटना ताज्या असताना राजस्थानातील नागपूरमध्ये अशाच प्रकारची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचे तुकडे विविध ठिकाणी टाकून दिले आहेत. मृत महिलेचं नाव गुड्डी असून ती विवाहित आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून त्याचं नाव अनोपरम असं आहे. आरोपी अनोपरम यांचं मागील काही दिवसांपासून विवाहित गुड्डीबरोबर प्रेमसंबंध सुरू होते. विवाहित असूनही मृत गुड्डीने आरोपी अनोपरम याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. याच कारणातून आरोपीनं गुड्डीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना राजस्थानच्या नागपूर जिल्ह्यातील श्री बालाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. २० जानेवारी रोजी पीडित महिला ‘सासरी जात आहे’ असं सांगून माहेरहून निघाली होती. पण ती सासरी मुंडासर येथे पोहोचली नाही. त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत गुड्डीचा फोनही बंद झाला.
हेही वाचा- ‘गर्लफ्रेंडचा खून करून मृतदेह बेडमध्ये ठेवला अन्…’, नालासोपारा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
यानंतर २२ जानेवारी रोजी कुटुंबीयांनी श्री बालाजी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. २८ जानेवारी रोजी पोलिसांना मृत महिलेचे कपडे, जबडा, केस आणि शरीराचा इतर काही भाग नागपूर शहरातील माळवा रस्त्यावरील केंद्रीय महाविद्यालयाच्या पाठीमागे सापडला. संबंधित कपड्यांवरून पीडितेच्या कुटुंबीयांनी मृताची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
हेही वाचा- निक्की यादव हत्याकांडात मोठा खुलासा; २०२० मध्येच आरोपी साहिलशी केलं होतं लग्न!
प्राथमिक संशयाच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेच्या प्रियकराला अटक केली. घटनेच्या दिवशी आरोपीला पीडित महिलेसोबत दुचाकीवरून फिरताना काहीजणांनी पाहिलं होतं. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपण प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे विविध ठिकाणी टाकल्याचं आरोपीनं सांगितलं. पोलीस मृत महिलेच्या शरीराचे तुकडे जमा करत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.