हल्ली काहीही केलं तरी सर्वात आधी ते फेसबुकवर टाकण्याची सगळ्यांनाच घाई असते. मात्र बंगळुरुमधील एका व्यक्तीला स्वत:चाच फोटो फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर टाकल्याने अटक झाली आहे. कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील ही घटना आहे.
हसन जिल्ह्यातील चन्नरयापटना तालुक्यात राहणाऱ्या नागराज या व्यक्तीने १३ ऑगस्ट रोजी एका पक्षाची शिकार करुन तो पक्षी शिजवून खाल्ला. मात्र हे करताना त्याने एक चूक केली ती म्हणजे हे सर्व करता त्याने काढलेले फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले. नागराजचे आपल्या दोस्तांबरोबरचे हे फोटो व्हायरल झाले. अनेकांनी या फोटोंवर आक्षेप नोंदवून टिका केल्यानंतर वनविभागाला जाग आली. मग सोशल मिडियावरूनच नागराजचा माग घेत वनविभागाचे अधिकारी नागराजपर्यंत पोहचले. नागराजच्या व्हॉट्सअप नंबरच्या मदतीने त्याला शोधून काढत त्याच्यावर वन संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. आता वनविभाग नागराजच्या दोस्तांचा शोध घेत आहे. लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.



