Udaipur Man Kills Family: आर्थिक विवंचनेतून स्वतःसह कुटुंबाला संपवण्याच्या घटनेत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. राजस्थानच्या उदयपूर येथे शुक्रवारी दुपारी एका ४० वर्षीय इसमाने पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांना संपवून आत्महत्या केली. उदयपूरमधील हिरन मगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात नगर येथे सदर घटना घडली.

पोलीस ठाण्याचे प्रमुख भरत योगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप चितारा हे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. गुरूवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर जे दिसले ते अतिशय भयंकर होते. दिलीप चितारा यांनी गळफास घेतलेला होता. तर त्यांची पत्नी अलका (३७) आणि मनवीर (१०), खुशबीर (३) हे तिघेजण बेडवर निपचित पडले होते.

करोनानंतर सगळंच बदललं…

प्राथमिक तपासानुसार, दिलीप यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला आणि मुलांना विष देऊन मारले. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी लिहिले की, करोनानंतर यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आर्थिक स्थिती बिघडत गेल्यामुळे त्यांना कर्ज काढावे लागले. या कर्जाचा बोजा वाढल्यानंतर त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले.

काकांकडून घर विकण्याचा सल्ला

दिलीप चितारा यांचे काका मानक चितारा यांनी सांगितले की, ५ ते ६ महिन्यांपूर्वी दिलीपने आर्थिक अडचणी आणि कर्जाविषयी मला सांगितले होते. घर विकून कर्ज फेडून टाक, असा सल्ला मी त्याला दिला होता. काही दिवसांपूर्वी मी त्याच्या दुकानात गेलो होतो, तेव्हा आमच्या नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Udaipur MBBS student suicide
उदयपूरमधील पॅसिफिक डेंटल कॉलेजमधील एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने केली आत्महत्या

एमबीबीएस विद्यार्थीनीचीही आत्महत्या

दरम्यान उदयपूरमध्ये आणखी एका आत्महत्येमुळे खळबळ माजली आहे. उदयपूरच्या पॅसिफिक डेंटल कॉलेजमधील एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. सदर विद्यार्थीनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कॉलेच्या प्रशासनावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील वातावरण तापले असून इतर विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.