राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत सहाजणांनी अर्ज भरला आहे. बुधवारी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज करण्याचा पहिला दिवस होता. १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. बुधवारी (काल) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सहाजणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. पद्मराजन यांचा समावेश आहे. पद्मराजन यांच्या नावाची नोंद याआधीच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आहे.

तमिळनाडूच्या सेलमचे रहिवासी असलेले के. पद्मराजन यांनी आतापर्यंत १५० हून अधिक वेळा निवडणूक लढवली आहे. त्यामुळेच त्यांना ‘इलेक्शन किंग’ म्हटले जाते. विशेष म्हणजे पद्मराजन यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवण्यात आले आहे. ‘सर्वाधिक अयशस्वी उमेदवार’ म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये पद्मराजन यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

के. पद्मराजन यांनी आतापर्यंत अनेक दिग्गजांविरोधात निवडणूक लढवली आहे. तमिळनाडूच्या तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता, द्रमुकचे सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी, माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (राज्यसभा निवडणूक) आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात पद्मराजन यांनी निवडणूक लढवली आहे.

पद्मराजन यांच्यासह सहाजणांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक अर्ज भरला आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या ग्वालियारमधील आनंद सिंह कुशवाह, तेलंगणाच्या मेहबूबनगरमधील ए. बाला राज, मुंबईच्या सायरा बानो पटेल, अब्दुल हमीद पटेल आणि पुण्याच्या विजयप्रकाश कोंडेकर यांचा समावेश आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ जुनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १७ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान पार पडणार आहे. यानंतर २० जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत असून त्यानंतर लगेचच नवे राष्ट्रपती पदभार स्वीकारणार आहेत.