माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानवरून केलेली टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात अडकली असताना आता त्यांनी चीनबद्दल केलेले विधान वादात अडकले आहे. फॉरेन कॉरस्पॉडंट्स क्लब येथे ‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना अय्यर यांनी १९६३ च्या भारत-पाकिस्तान युद्धाला “चीनने केलेला कथित हल्ला”, असे म्हटले. चीनने केलेला हल्ला हा कथित असल्याचे म्हटल्यामुळे भाजपाने आता यावर आक्षेप घेत टीका केली आहे. अय्यर यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात श्रोत्यांमधील एका उपस्थिताने कथित शब्द वापरल्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी आपल्या भूमिकेत लगेच सुधारणा करत त्यांनी चुकून तो शब्द वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र भाजपाने ही संधी साधत काँग्रेस आणि अय्यर यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, अय्यर यांना चीनी आक्रमणाचा संदर्भ पुसून टाकायचा आहे.

अमित मालवीय यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नेहरूंनी चीनमुळे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्वावर पाणी सोडले, राहुल गांधी गूप्तपणे सामंजस्य करार करतात, राजीव गांधी फाऊंडेशनने चीनी दुतावासाकडून निधी स्वीकारला आणि चीनी कंपन्यांना आपला बाजार खुला केला. आता काँग्रेस नेते चीनी आक्रमणाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनने भारताच्या ३८ हजार चौरस मीटर जमिनीवर अवैधपणे कब्जा केलेला आहे.

दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी मात्र मणिशंकर अय्यर यांच्या भूमिकेपासून फारकत घेत, पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, मणिशंकर अय्यर यांनी कथित आक्रमण हा शब्द चुकून वापरला होता. त्याबद्दल त्यांनी तात्काळ माफीही मागितली. त्यांच्या वयाकडे पाहता, काही बाबतीत त्यांना आपण सूट द्यायला हवी. काँग्रेस मात्र त्यांच्या वाक्यापासून अंतर राखून आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अय्यर यांच्या टिप्पणीपासून फारकत घेत असताना त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ते म्हणाले की, २० ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले हे वास्तव आहेच. त्याशिवाय मे २०२० साली चीनने लडाख येथे हल्ला करून आमच्या २० जवानांना शहीद केले, हेदेखील तितकेच खरे आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी ही बाब देशासमोर स्पष्टपणे नाकारली होती, हे जयराम रमेश यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केले.