मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांनी आपला जीव गमावला. एक कर्नल तसंच चार जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर कर्नलच्या परिवारातल्या दोन सदस्यांचाही या हल्ल्यात जीव गेला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी मणिपूर नागा पीपल्स फ्रंटने (MNPF) घेतली असून कर्नलचा परिवार सोबत होता हे माहित नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

MNPFने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. या निवदेनात हिंसाचाराच्या या घटनेबाबत सविस्तर नमूद करण्यात आलं आहे. या निवेदनात असंही म्हटलं आहे की हल्ला करणाऱ्यांना हे माहित नव्हतं की या जवानांसोबत कर्नलची पत्नी आणि लहान मूलही होतं. जवानांनी आपल्या परिवाराला अशा संवेदनशील भागांमध्ये आणू नये असा सल्लाही या निवेदनातून देण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की, ज्या परिसराला सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केलं आहे, त्या भागांमध्ये परिवारांनी वावरणं योग्य नाही.

हेही वाचा – मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद; कर्नलची पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हे संयुक्त निवेदन उपप्रचार सचिव रोबेन खुमान आणि थॉमस नुमाई यांनी दिलं आहे. त्यांनी या हल्ल्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आता सरकार या संघटनेवर कधी आणि काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी आधीच सांगितलं आहे की, या प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीला सूट दिली जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

काय आहे हे प्रकरण?

४६ आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी सकाळी एका लष्करी छावणीवर गेले होते. तेथून परतताना सकाळी १०च्या सुमारास संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर म्यानमार सीमेजवळच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील शेखन गावानजीक हल्ला केला. दहशतवाद्यांनी ‘आयईडी’ स्फोट घडवून आणल्यानंतर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल ‘आसाम रायफल्स’च्या जवानांनीही गोळीबार केला. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी (४१), त्यांची पत्नी अनुजा (३६) आणि सहा वर्षांचा मुलगा अबीर यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चार जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत.