मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली आहे. सोमवारी ( २२ मे ) मणिपूरची राजधानी इम्फाळच्या न्यू लाम्बुलेन परिसरातील घरांना जमावाने आग लावली. यानंतर लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे. या घटनेनंतर मणिपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, सोमवारी राज्यात सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती. तसेच, २६ मे पर्यंत पाच दिवस इंटरनेटही बंद करण्यात आलं आहे.

नेमकं का घडलं इम्फाळमध्ये?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी इम्फाळच्या न्यू चेकन बाजार परिसरात हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर जमावाने काही घरांना आग लावली. ही घटना समोर येताच पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला परिसरात तैनात करण्यात आलं आहे.

मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा हिंसाचाराची घटना समोर आसल्यानंतर भारतीय सेनेकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. इम्फाळमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर आसाम रायफल्सच्या तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. संबंधित तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून दोन हत्यार ताब्यात घेतली आहेत.