दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर उत्पादन शुल्क धोरणाशी निगडित गुन्ह्यात सीबीआयने कारवाई केली आहे. त्यांच्या निवासस्थानी सीबीाआयने धाड टाकल्यानंतर आम आदमी पक्षाकडून (आप) भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील भाजपाला लक्ष्य केलंय. त्यांनी मनीष सिसोदिया यांना ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करायला हवे होते. मात्र त्यांनी छापेमारीच्या माध्यमातून त्रास दिला जातोय, असे विधान केले. केजरीवाल सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विधान केले.

हेही वाचा >> “’आप’ फोडा आणि आमच्यासोबत या”; भाजपाने ऑफर दिल्याचा मनिष सिसोदियांचा दावा

“सिसोदिया यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे देशभरातील जनता नाराज आहे. त्यांच्याकडे देशातील शिक्षण व्यवस्था सोपवायला हवी. त्यांनी मागील पाच वर्षांत चमत्कारिक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलला आहे. या कामाच्या माध्यमातून ते देशाच्या मुलांचे भवतव्य सुधारण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. सिसोदिया यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा >> “मी पंतप्रधान बनायला नाही तर…” गुजरातमधील प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांचं दावेदारीवरून स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या घरावर छापा टाकल्यामुळे राजपूत समाजातील लोक नाराज आहेत, असे वक्तव्य सिसोदिया यांनी याआधी केले होते. यावर प्रश्न विचारला असता सर्वच जातीधर्मातील लोक नाराज आहेत, असे उत्तर केजरीवाल यांनी दिले. “क्षत्रीय, वैष्य, क्षुद्र, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, महिला, छोटी मुलं तसेच सर्व समाजातील लोक या कारवाईमुळे नाराज आहेत. आगामी चार ते पाच दिवसांमध्ये त्यांना अटक केले जाऊ शकते. त्यांना अटक केल्यानंतर त्याचा परिणाम आगामी तीन ते चार महिन्यात शिक्षण व्यवस्थेवर होईल. त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप खोटा आहे. सिसोदिया यांच्या अनुपस्थित आम्ही कामावर परिणाम होऊ देणार नाही. मात्र ते नसल्यामुळे काही अडचणी मात्र नक्की येतील,” असेदेखील केजरीवाल म्हणाले.