बिहारमधील जनता दल (संयुक्त)च्या विधिमंडळ सदस्यांनी नितीशकुमार यांची नेतेपदी निवड केली असली, तरी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी अद्याप राजीनामा न दिल्यामुळे राज्यातील राजकीय पेच कायम आहे. तर नितीशकुमार यांना होयबा मुख्यमंत्री हवा असे टीकास्त्र मांझी यांनी सोडले आहे. जनता दल(यू) व त्याच्या मित्रपक्षांनी नितीशकुमार यांना पाठिंब्याचे पत्र राजभवनाला दिले आहे.विधानसभेच्या अध्यक्षांनीही कुमार यांच्या निवडीला मान्यता दिली आहे.
भाजप हा जनता दलात फूट पाडत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे, तर नितीशकुमार यांच्या सत्तालालसेमुळेच हे संकट ओढवल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. राज्यपाल सोमवारी पाटण्यात आल्यानंतर सध्याचा तिढा सुटण्याचे प्रयत्न होतील, असे दिसत आहे.
जनता दल(यू) व त्याच्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी राजभवनात जाऊन, नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे पत्र तेथील अधिकाऱ्यांना
दिले.
या आमदारांमध्ये राजद, काँग्रेस, भाकप या पक्षांसह एका अपक्ष आमदाराचा समावेश असल्याचे जद(यू)चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी राजभवनातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांना सांगितले. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे सोमवारी पाटण्यात आल्यानंतर शरद यादव आणि नितीशकुमार त्यांना भेटून सरकार स्थापण्याचा औपचारिक दावा करतील, असे सिंग म्हणाले.
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत जनता दलाचे १११, भाजपचे ८७, राजदचे २४, काँग्रेसचे ५ व अपक्ष ५ आमदार असून, १० जागा रिक्त आहेत.
नितीशकुमारांवर टीका
एक दलित व्यक्ती ‘रबर स्टँप मुख्यमंत्री’ म्हणून काम करेल असे नितीशकुमार यांना वाटले, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मी जेव्हा आत्मसन्मानाने काम करू लागलो, तेव्हापासून नितीशकुमार यांना माझा त्रास होऊ लागला. मात्र नितीशकुमार यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करेपर्यंत मीच मुख्यमंत्री आहे, असा दावा मांझी यांनी केला. आपण काहीही चुकीचे केलेले नसल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.२० फेब्रुवारी रोजी विधानसभेत मी आपले बहुमत सिद्ध करीन, असा विश्वास मांझी यांनी व्यक्त केला. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी आपण कुणाचाही पाठिंबा घेऊ, असे त्यांनी सांगितले.