माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आवाहन
देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे सरकारने राजकीय सूडभावना बाजूला ठेवून विवेकी-विचारी लोकांशी चर्चा करावी आणि या मानवनिर्मित संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढावे, असे आवाहन माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी रविवारी केले.
मोदी सरकारच्या सर्व क्षेत्रातील गैरव्यवस्थापनामुळे मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. गेल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा (जीडीपी) दर ५ टक्क्य़ांपर्यंत घसरला. याचा अर्थ आपण प्रदीर्घ मंदीच्या कचाटय़ात सापडलो आहोत. वेगाने आर्थिक विकास करण्याची भारताची क्षमता आहे, पण मोदी सरकारच्या सर्व क्षेत्रांतील गैरव्यवस्थापनामुळे ही वेळ ओढवली आहे, अशी टिप्पणी मनमोहनसिंग यांनी केली.
सरकारवर टीका करताना माजी पंतप्रधान म्हणाले, ‘‘देशातील युवक, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, वंचित घटक यांना चांगल्या आर्थिक स्थितीची अपेक्षा आहे. परंतु देशाला सध्याच्या मार्गाने जाऊन चालणार नाही. सरकारने सूडाचे राजकारण सोडून सर्व विचारी माणसांशी सल्लामसत करून या मानवनिर्मित अर्थपेचातून देशाला बाहेर काढावे.’’
सरकारने रिझव्र्ह बँकेकडून १.७६ लाख कोटींचा राखीव निधी घेतल्याबाबत ते म्हणाले, ‘‘रिझव्र्ह बँकेची स्वायत्तता सरकारने ठेवलेली नाही. शिवाय या निधीचा वापर कशासाठी करणार, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. आर्थिक विकास दराने १५ वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. करमहसुलाला भगदाड पडले आहे. करतरलता हे मृगजळ ठरले आहे. कर दहशतवाद माजला आहे. गुंतवणूकदारांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. ही अर्थव्यवस्था सावरण्याची लक्षणे नाहीत.’’
मोदी सरकारच्या धोरणावर टीका करताना मनमोहनसिंग म्हणाले की, ‘‘वाहन उद्योग क्षेत्रात तीन लाख ५० हजार लोकांनी रोजगार गमावले आहेत. असंघटित क्षेत्रातील अनेकांच्या हातचे काम गेले आहे. हे कामगार देशोधडीला लागले आहेत.’’
महागाई रोखण्यासाठी शेतकऱ्याचा बळी
शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांचे उत्पन्न घटले आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला आहे. याचाच अर्थ देशातील ५० टक्के ग्रामीण जनतेला त्याच्या झळा बसल्या आहेत. देशाच्या आर्थिक माहितीच्या विश्वासार्हतेवरही या सरकारच्या काळात प्रश्नचिन्ह लागले आहे. अर्थसंकल्पात घोषणा करून नंतर काही तरतुदी मागे घेणे यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक दारांचा विश्वास उडाला आहे. भूराजकीय स्थितीमुळे निर्माण झालेल्या निर्यात वाढीच्या संधीचा भारताला लाभ घेता आला नाही, असेही मनमोहन सिंग यांनी निदर्शनास आणले.