पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग श्रीलंकेतील ‘चोगम’ शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे संकेत मिळत असतानाच त्यांच्या दौऱ्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे शनिवारी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. स्वपक्षीयांसह तामिळनाडूतील विविध पक्षांनी पंतप्रधानांच्या श्रीलंका दौऱ्याला विरोध दर्शविला आहे.
चोगम परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार, याबाबत भारत सरकारने अद्याप श्रीलंकेला काहीही कळविलेले नाही. पंतप्रधानांनी दौरा टाळला तर त्यांच्याऐवजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी श्रीलंकेला जाणार का, या प्रश्नावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले.
आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्याबाबतचा निर्णय घेण्याची प्रक्रिया निमंत्रण आल्यानंतर सुरू होते आणि त्यानंतरही अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात आणि सध्या ती प्रक्रिया सुरू आहे, असेही अकबरुद्दीन म्हणाले. श्रीलंकेला अद्याप निर्णय कळविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्याबद्दल राजकीय स्तरावर उलटसुलट तर्कवितर्क करण्यात येत होते. त्यांच्या या दौऱ्यास तामीळनाडूतील विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. तामिळींच्या समस्येवरून राजकीय स्तरावर पंतप्रधानांच्या दौऱ्यास विरोध करण्यात येत आहे.