गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर विदेशात उपचार केले जाऊ शकतात अशी शक्यता आहे. आज सकाळी त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. आवश्यकता भासल्यास त्यांना उपचारांसाठी अमेरिकेत पाठवले जाईल अशीही माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे गोव्याचा कारभार पाहण्यासाठी एका त्रिसदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत ही समिती कामकाज पाहणार आहे. या समितीत तीन सदस्यांचा समावेश आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी एक बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक खात्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला. तसेच फ्रान्सिस डिसोझा, सुनील ढवळीकर आणि विजय सरदेसाई या तिघांची एक समिती स्थापण्यात आली आहे. ही समिती गोव्याचे कामकाज पाहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिल्याचे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे. पर्रिकर यांना १५ फेब्रुवारी रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पर्रिकर यांच्या स्वादुपिंडाला सूज आली होती.त्यावेळी त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आवश्यकता भासल्यास खासगी विमानाने मनोहर पर्रिकर अमेरिकेत जातील आणि तिथे उपचार घेतील अशीही माहिती समोर येते आहे. गोव्यातील अर्थसंकल्प सादर केल्यावर त्यांना गोवा मेडिकल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.